सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असताना एकामागोमाग एक जोड्या विवाहबंधनात अडकत आहेत. अशातच मालिकाविश्वातील एक लोकप्रिय जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली. अभिनेत्री तितीक्षा तावडे व अभिनेता सिद्धार्थ बोडके यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला आहे. या मालिकाविश्वातील जोडीच्या लग्नानंतर आता आणखी एक जोडी विवाहबंधनात अडकली आहे. ही जोडी म्हणजे जीव माझा गुंतला फेम अभिनेत्री योगिता चव्हाण व अभिनेता सौरभ चौघुले. मल्हार व अंतरा या भूमिका साकारत सौरभ व योगिता यांनी प्रेक्षकांची मन जिंकली. (Yogita Chavan and Saorabh Chaughule Wedding)
मालिकेत जसजसं या दोघांचं नातं फुलत गेलं अगदी तसेच खऱ्या आयुष्यातही ही जोडी लग्नबंधनात अडकली आहे. ३ मार्चला सौरभ व योगिता यांचा लग्नसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. त्यांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी उपस्थिती लावली होती. सध्या योगिता व सौरभच्या विवाहसोहळातील फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्यात एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेचं शीर्षक गीत लावून या जोडीने त्यांच्या लग्नातील खास क्षण या व्हिडीओमधून शेअर केले आहेत.
सौरभ व योगिता यांच्या लग्नातील या व्हिडीओमध्ये त्यांच्या लग्नातील सातफेरे, वरात, वरमाला व लग्नविधींची झलक पाहायला मिळत आहे. शिवाय त्यांचा आणखी एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यांत नववधूची रॉयल एंट्री साऱ्यांच्या पसंतीस पडली आहे. ठेका धरत योगिताने मंडपात एंट्री करताच सौरभने शिट्टी मारत तिचं स्वागत केलं. त्यानंतर सौरभ व योगिता दोघांनी एकत्र ठेका धरलेला पाहायला मिळाला. त्यांच्यासह त्यांचा मित्रपरिवार व कुटुंबीय यांनीही ठेका धरला.
योगिता व सौरभ यांनी थेट लग्नाचे फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो समोर येताच साऱ्यां चाहत्यांना सुखद धक्का बसला. मालिका संपल्यानंतरही या जोडीला एकत्र पाहून अनेकांनी आनंद व्यक्त करत दोघांच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. योगिता सौरभ यांच्या लग्नाला कलाविश्वात अक्षया नाईक, अक्षय केळकर, पुर्वा शिंदे, सुमेध दातार या कलाकारांनी हजेरी लावली होती.