Ajit Pawar Death : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर येताच संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. आज सकाळी अजित पवार हे आपल्या काही सहकाऱ्यांसह मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत होते. मात्र, बारामतीकडे येताना विमानाचे लँडिंग सुरू असतानाच हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर मराठी मनोरंजनविश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. या घटनेचा परिणाम मराठी मनोरंजनसृष्टीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. अनेक कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते व निर्माते मंगेश देसाई यांनीही अजित पवार यांच्याविषयीची एक हृदयस्पर्शी आठवण सोशल मीडियावर शेअर करत आपली भावना व्यक्त केली आहे.
आणखी वाचा – अरिजीत सिंगने घेतला रिटायरमेंटचा निर्णय; खरं कारण सांगत केली पोस्ट; म्हणाला, “यामागे एकच कारण नाही…”
अभिनेते व निर्माते मंगेश देसाई यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, “दादा जेव्हा जेव्हा भेटायचे तेव्हा ‘अरे तुम्ही नमस्कार… आता काय नवीन?’ असा प्रश्न हमखास विचारायचे. एका इव्हेंटच्या निमित्ताने आमची पुण्यात भेट झाली. मी दादांना म्हणालो, ‘दादा एक फोटो काढायचा आहे तुमच्याबरोबर…’ तर मला म्हणाले, ‘अहो मंगेशराव तुम्ही अभिनेते मोठे निर्माते मला तुमच्याबरोबर फोटो काढायचा आहे.’ पण, खंत एकच राहिली तो फोटो काढायचा राहिला. कलाकार प्रेमी आणि परखड व्यक्तिमत्व आज आपल्यातून गेलं. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.” मंगेश देसाई यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असून, अनेकांनी त्यांच्या भावनांशी सहमती दर्शवली आहे. अजित पवार यांच्या निधनाने राजकारणासह कलाविश्वातही शोककळा पसरली आहे.
आणखी वाचा – “त्यांचं अकाली जाणं…”; अजित पवारांच्या निधनानंतर रितेश देशमुखची भावुक पोस्ट, म्हणाला, “ही पोकळी कधीही…”



