‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीझनमधील एक लोकप्रिय आणि नेहमीच चर्चेत राहिलेली स्पर्धक म्हणजे रुचिरा जाधव. शांत स्वभाव आणि दमदार खेळीच्या जोरावर रुचिराने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. रुचिरा जाधव सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. अशातच तिने शेअर केलेली एक पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. रुचिराने शेअर केलेली ही पोस्ट आक्षेपार्ह असून सध्या तिच्या या पोस्टकडे साऱ्यांच्या नजरा वळून राहिल्या आहेत. (Ruchira Jadhav On Bigg Boss Marathi Season 5)
रुचिराने केलेलं भाष्य हे ‘बिग बॉस मराठी’मध्ये होणाऱ्या हिंसेवर असून फुटेज साठी काहीही केलं जात या उद्देशाने केलं आहे. रुचिराने पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “थोडं व्यक्त व्हावसं वाटतंय. मिळालेल्या माहिती नुसार, अरबाज पटेलच्या धक्क्यामुळे अभिजीत सावंत खूप जखमी झाला आहे. सद्या तरी त्याला खूप वेदना होत आहे असे कळालं आहे. मुळात ‘हिंसेला’ तिथे जागा नाही, असं म्हटलं जातं. पण फक्त म्हटलं जातं. फुटेज मिळेपर्यंत हिंसा हवीच असते नाहीतर आहे तसं चालते. एकदा का फुटेज मिळालं की मग आवाज येतो. थांबा. (कदाचित मी चुकीची असेन पण मी फक्त मला आलेल्या अनुभवावरुन बोलत आहे)”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्की-अरबाजमध्ये पुन्हा फाटाफूट, वाद नेमका कोणामुळे?, गेमसाठी प्रेमही संपले अन्…
पुढे ती म्हणाली, “फार जवळून बघितलंय मी हे सगळं. पहिल्यांदा संचालक झाले, तेव्हा समोर दिसणारी हिंसा थांबवण्यासाठी वा अजून वाढू नये म्हणून टास्क थांबवला होता. मला वीकेंडला ओरडा पडला. दुसऱ्यांदा संचालक झाले, तेव्हा ठरवलं. काहीही अगदी काहीही झालं तरी चालेल, मी मध्ये पडणार नाही. थांबवणार नाही. फार काही नाही. तेव्हा काचा फुटल्या होत्या. आणि दोन सदस्यांना खुप लागलं होतं, काचा पाठीत रुतल्या होत्या. त्यानंतर टास्क थांबवण्यात आला. हा आहे मानवी भावनांचा खेळ. दुर्दैवाने काही अपवाद सोडले तर आजच्या प्रेक्षकांना हेच बघायचं आहे. बघा. (जेवढं दाखवतात तेवढं बघा. त्याच्या पलीकडे सुद्धा बरंच काही घडत असतं जे फक्त तिथे गेल्यावर कळतं)”.
यापुढे ती असंही म्हणाली की, “अशा करते की अभिजीत बरा असेल. खरं सांगायचं तर, माझा आवडता शो आता मी बघत नाही. (कारण त्या so called ‘घरात’ मी जाऊन आले आहे). सोशल मीडियावरुन अपडेट मिळत असतात. नुकतंच एका रीलमध्ये अभिजीतला वीकेंडला छान व्यक्त झालेलं बघितलं आणि त्याची ती गोष्ट मला भावली. म्हणून मी माझ्या भावना शेअर केल्या. माझ्या मनात शोबद्दल कोणताही द्वेष नाही. माझ्या वाट्याला येणाऱ्या प्रत्येक कामाचा मला खूप आदर आहे कारण मी ते मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि रुचिरासाठी हे खूप गरजेचं होतं. जगाची सर्वात घाणेरडी बाजू माझ्यासमोर मांडल्याबद्दल मी या शोची नेहमीच ऋणी राहीन. मी आता जुनी रुचिरा राहिली नाही. आणि याचे BIG BOSS ला पूर्ण श्रेय मिळते. यावेळी आणि नेहमी मानवी आत्म्याचा विजय असो”, असं म्हणत भावना शेअर केल्या आहेत.