व्यावसायिक रंगभूमीकडे जाण्याचा एक मार्ग म्हणून प्रायोगिक नाटकांकडे बघितलं जातं. मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळी ही प्रायोगिक व व्यावसायिक नाटकं करत मालिका किंवा चित्रपटांकडे वळतात. असाच एक अभिनेता म्हणजे विराजस कुलकर्णी. ‘माझा होशील ना?’ या लोकप्रिय मालिकेतून विराजसने प्रेक्षकांच्या मनात घर केले. यानंतर त्याने काही चित्रपटांतदेखील अभिनय केला. मात्र त्याचा हा प्रवास प्रायोगिक नाटकांपासून सुरु झाला आहे.
प्रायोगिक नाटक म्हटलं की गडबड, गोंधळ करत प्रयोग सादर करणं हे आलंच. अनेक कलाकार मंडळी या प्रवासातून जात असतात आणि यादरम्यान अनेक गंमती-जमती, किस्से हे होतंच असतात. असाच प्रायोगिक नाटकादरम्यानचा एक किस्सा विराजसने शेअर केला आहे नुकत्याच पार पडलेल्या ‘झी नाट्य गौरव २०२४’ या सोहळ्याच्या निमित्ताने विराजसने त्याचा एक गंमतीशीर किस्सा शेअर केला आहे.
माझं पहिलं प्रयोगिक बालनाट्यात मी चार्ली चॅप्लिनची भूमिका करत होतो. तेव्हा एका प्रयोगाला दिग्दर्शकाची तब्येत बरी नसल्यामुळे तो थेट प्रयोगाला येणार होतो. तेव्हा तो प्रयोग सहा वाजता होता आणि पावणे सहा वाजले तरी आम्ही अजून पोहोचलो नव्हतो. त्यामुळे आम्ही कसं तरी करुन पहिल्या अंकांचा सेट उभा केला आणि दिग्दर्शकाला सेट लावून झाला आहे असं सांगितलं आणि कसा बसा प्रयोग सुरु केला.”
यापुढे त्याने असं म्हटलं की, “या नाटकात माझी चार्ली चॅप्लिनची महत्त्वाची भूमिका असून मी प्रेक्षकांमधून एंट्री घेणार होतो. पण त्याआधी माझ्या लक्षात आलं की, नाटकाच्या धावपळीमध्ये मी माझी पँट घरीच विसरलो आहे. अवघ्या काही मिनिटांनी माझी एंट्री होणार होती. म्हटलं आता काही खरं नाही, शॉर्ट पँटवरच मला आता प्रयोग करावा लागणार की काय?. मग मी प्रेक्षागृहाच्या बाहेर प्रेक्षकांच्या मागे उभा असताना माझा एक मित्र माझी पँट घेऊन आला. मग मी पँट घालत-घालत एंट्री केली आणि तो प्रयोग यशस्वी पार पडला.”