‘पारू’ मालिकेच्या भागात असे पाहायला मिळतं की, दिशा किर्लोस्करांच्या घरी आलेली असते आणि ती सगळ्यांना त्यांच्या साखरपुड्याचे फोटो दाखवत असते. तितक्यात दामिनी रागा-रागात येते आणि म्हणते की, मारुती आणि त्याच्या त्या मुलीने नियम मोडला आहे. आणि त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे असं तावातावात बोलते. तेव्हा सर्व लोकांना कळत नाही की, दामिनी नेमकं काय बोलत आहे. त्यानंतर अहिल्यादेवी सावित्रीला पारुला आणि मारुतीला बोलवायला सांगतात तेव्हा आदित्य, प्रीतम, मारुती पारू, गणी आणि वैजूदेखील किर्लोस्करांच्या घरी येतात. (Paaru Serial Update)
तिथे आल्यानंतर अहिल्यादेवींना दामिनी स्वतःच पारूच्या बकरी बद्दल सर्व काही सांगते आणि सांगते की मीच या बकरीला नेऊन आधी बंगल्याबाहेर सोडलं होतं मला वाटलं की हे आपल्या नियमात बसत नाही. अहिल्यादेवींच्या नियमात हे बसणार नाही म्हणून मी हिला बंगल्याबाहेर सोडून आले मात्र हा प्रीतम तिला जाऊन पुन्हा घेऊन आला आणि आता पुन्हा काल दिशाच्या पायाला त्या बकरीने चाटलं आणि त्यामुळे दिशा पाण्यात पडली म्हणून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यामुळे या बकरीला मटन विक्रेत्याला देऊन टाकलं. हे ऐकल्यावर अहिल्यादेवी पारुला विचारतात की, तुला काही बोलायचं आहे का?, त्यावर पारू सांगते की, आजच आम्ही तुम्हाला वैजूबद्दल सगळं काही सांगणार होतो. हवं तर तुम्ही आदित्य सरांना विचारा. पारू सांगते की, वैजूच्या जन्मापासून ती माझ्याबरोबर आहे. गावावरून इकडे येताना मला माहित नव्हतं की, वैजू इथे राहिलेली चालणार नाही, नाहीतर मी तिची गावीच काहीतरी सोय करून आले असते. पण वैजूचं काही बरं वाईट होऊ नये असं मला वाटत होतं. वैजू माझ्यापासून दूर जाऊ नये म्हणून मी तुमच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली असं ती कबूल करते.
त्यानंतर अहिल्यादेवी उलट दामिनीची चांगली शाळा घेतात आणि म्हणतात की, बकरी पाळायची नाही हा नियम मी घातला. दामिनी तू त्या एका निष्पाप जीवाला बंगल्याबाहेर सोडलं आणि एका मटण विक्रेत्यालाही विकलं. तू ही चूकच नाही तर हा गुन्हा देखील केला आहेस. त्यामुळे तुलाही शिक्षा होणारच. तर पारूकडे बघत त्या असं म्हणतात की, कारण काही दिलं तरी माझ्यापासून गोष्ट लपवून ठेवलीस म्हणून तुला सुद्धा शिक्षा होणार असे म्हणत त्या शिक्षेची सुनावणी करतात आणि सांगतात की पारू यापुढील आठ दिवस तू किर्लोस्कर बंगल्यात पाय सुद्धा ठेवायचा नाही आणि त्यानंतर दामिनीला शिक्षा सुनावतात की, पुढील ८ दिवस पारूची जी काही काम असतील ती तू करशील. हे ऐकल्यावर दामिनीच्या तळपायाची आग मस्तकात जाते दामिनी म्हणते की, मोलकरणीची काम करायला मी काही मोलकरीण नाही. मी या किर्लोस्कर फॅमिलीची सून आहे. अशी मोलकरणीची काम मला जमणार नाही. मला ही शिक्षा मंजूर नाहीये मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जाते असं म्हणत ती खोलीत जाते आणि बॅग भरू लागते. तेव्हा तिचा नवरा तिला मदत करत असतो आणि म्हणतो की तुला जायचे तर तू जा मी काही तुझ्याबरोबर येणार नाही.
अहिल्यादेवी पारू आणि गणीला जायला सांगतात आणि मारुतीला थांबायला सांगतात. तेव्हा गणी व पारू लाल दरवाजा बाहेरच उभे राहून अहिल्यादेवींचा बोलणं ऐकतात. अहिल्यादेवी म्हणतात की, पारूच्या लग्नाची जबाबदारी ही आम्ही घेतली आहे त्यामुळे तू त्याची काळजी करू नकोस. आम्ही पारूसाठी एक मुलगा निवडला आहे असं त्या म्हणताना दिसतात. आता मालिकेच्या येणाऱ्या भागात दामिनी घर सोडून जाणार का?, अहिल्यादेवींनी निवडलेला मुलगा कोण आहे हे पारूला समजणार का?, हे सर्व पाहणं रंजक ठरणार आहे.