अभिनेता विक्रांत मेस्सी गेल्या काही दिवसांपासून ‘१२वी फेल’ या चित्रपटामुळे बराच चर्चेत आला आहे. विक्रांतच्या या चित्रपटाची जगभरात चांगलीच चर्चा रंगली. या चित्रपटातील भूमिकेमुळे त्याचं खूप कौतुकही झाले. विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटामध्ये केलेल्या सहजसुंदर अभिनयामुळे विक्रांतने सर्वांचीच मने जिंकली. तो चित्रपटसृष्टीतील वादविवादांवर सहसा व्यक्त होत नाही. पण आता मात्र त्याने एका चॅट शोमध्ये चंदेरी दुनियेतील कलाकारांची पोलखोल केली असून ते किती बेजबाबदार आहेत हे सांगितले आहे.
विक्रांत सहसा इतर कलाकारांवर वक्तव्य करणे टाळत असतो. पण आता बेजाबदार कलाकारांबद्दल त्याने त्याचं मत मांडलं आहे. याबरोबरच कॉस्मेटिक सर्जरीसंदर्भातही विक्रांत व्यक्त झाला आहे. तो म्हणाला की, “अनेक कलाकार असे आहेत जे सेटवर कामाकडे लक्ष देण्यापेक्षा रील बनवण्याकडे अधिक लक्ष देतात. हे वागणे बेजबाबदारपणाचे आहे”, असे विक्रांत म्हणाला. (Vikrant massey on unprofessional behavior)
पुढे विक्रांत म्हणाला की, “आपण नेहमी बघतो की, अनेक कलाकार सेटवर येतात तेव्हा ते रील बनवण्याला अधिक प्राधान्य देतात. मी त्यांची नावं घेणार नाही. मी नक्की कोणाला उद्देशून बोलतोय हे कलाकारांना नक्की समजेल आणि माझा त्यांना बोलण्याचा उद्देशही पूर्ण झाला आहे. हे सर्व मी कलाकारांना तोंडावरदेखील सांगू शकतो. माझ्याकडे सध्या कामाव्यतिरिक्त काहीही करण्यासाठी अजिबात वेळ नाही. मला माझं काम आवडतं आणि अभिनय हेच माझ्यासाठी सर्व काही आहे”, असे विक्रांतने स्पष्ट केले.
यादरम्याने विक्रांतने अभिनेता फरहान अख्तरचे तोंडभरून कौतुक केले आणि फरहानकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत असे सांगितले. विक्रांत म्हणाला की, “प्रेरणा कोणाकडून घ्यायची असेल तर त्यासाठी मी फरहानचे नाव घेऊ इच्छितो. मी फरहानकडून प्रेरित आहे. फरहानकडे काय नाही? तो सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचा मुलगा आहे. ‘दिल धडकने दो’या चित्रपटामध्ये फरहानने अभिनय केला तसेच चित्रपटाचा निर्मातादेखील आहे. फरहानची बहीण जोया या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होती. ‘दिल धडकने दो’ या चित्रपटाच्या तालमीदरम्याने त्याने कधीही स्क्रिप्ट हातात घेतली नाही. फरहानला स्वतःचे आणि इतर कलाकारांचे संवादही लक्षात असत. जर फरहानसारखा अभिनेता अभ्यास करत असेल तर आपल्याला लाज वाटली पाहिजे”.
कॉस्मेटिक सर्जरीबद्दल विक्रांत म्हणाला की, “चांगले दिसणे कोणाला आवडत नाही. मलाही कधी गरज पडली, शरीरयष्टी चांगली बनवायची असेल तर मीही विचार करेन”. सध्या विक्रांतचा ‘१२वी फेल’ हा चित्रपट आयएमडीबीच्या इंटरनॅशनल टॉप ५० चित्रपटांमध्ये असलेला एकमेव हिंदी चित्रपट आहे.