Rituraj Singh Death : सध्या सिनेसृष्टीतून एकामागोमाग एक दुःखद बातम्या समोर येताना पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच आमिर खानच्या दंगल चित्रपटातील छोट्या बबिता फोगटच्या निधनाच्या बातमीने साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. यापाठोपाठ आता मालिकाविश्वातील आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ अभिनेते ऋतुराज सिंह यांच्या निधनाच्या बातमी समोर येताच साऱ्यांना खूप मोठा धक्का बसला. वयाच्या ५९ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं असल्याचं समोर आलं.
ऋतुराज यांना मुंबईतील लोखंडवाला येथील राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आला. या अभिनेत्याच्या आकस्मिक निधनाने टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. तसेच अभिनेत्याच्या चाहत्यांनाही चांगलाच धक्का बसला आहे. ‘इटाइम्स’च्या वृत्तानुसार, ऋतुराजचा मित्र अमित बहल याने अभिनेत्याच्या मृत्यूबाबत भाष्य केलं आहे. ऋतुराज यांच्याबाबत शोक व्यक्त करत तो म्हणाला, “होय, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. स्वादुपिंडाच्या उपचारासाठी त्यांना काही वेळापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर घरी आल्यावर त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला आणि त्यांचे निधन झाले.”
I am so saddened to know that Ritu Raj passed away. We lived in the same building, he was a part of my first film as a producer. Lost a friend and a great actor… will miss you brother…
— Arshad Warsi (@ArshadWarsi) February 20, 2024
ऋतुराज टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’मध्ये दिसला होता. या मालिकेतील त्याची भूमिका विशेष चर्चेत राहिली. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेमध्येही या अभिनेत्याने भूमिका साकारली होती. ९०च्या दशकात झी टीव्हीवरील ‘तोल मोल के बोल’ हा रिॲलिटी गेम शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ऋतुराज सिंह यांनी टीव्हीवरील अनेक मालिका, अनेक चित्रपट व ओटीटी शोमध्ये काम केले होते. ‘हिटलर दीदी’, ‘ज्योती’, ‘शपथ’, ‘अदालत’, ‘आहट’, ‘दिया और बाती’, वॉरियर हाय’, ‘लाडो 2’ यांसारख्या मालिकांमध्येही त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
सोशल मीडियावर अनेक चाहते अश्रूपूर्ण डोळ्यांनी अभिनेत्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत. त्याचवेळी अनेक सेलिब्रिटी देखील अभिनेत्याच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.