गेल्या वर्षात बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. ‘पठाण’, ‘जवान’, ‘डंकी’, ‘अॅनिमल’, व ‘सॅम बहादूर’ यांसारख्या चित्रपटांनी ऑक्स ऑफिस कलेक्शनसह प्रेक्षकांच्या मनाचादेखील ठाव घेतला. या चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली होती. अशातच आता ओटीटीवरही हे चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज आहेत. विकी कौशलचा सॅम बहादूर या चित्रपटाची ओटीटी प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
मेघना गुलजार दिग्दर्शित सॅम बहादुर या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. हा चित्रपट देशातील पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात सॅम माणेकशॉ यांची भूमिका विकी कौशलने साकारली आहे. तसेच फातिमा सना सेख आणि सान्या मल्होत्रा यांनीही चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटीवरही प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट झी-५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहिला नाही ते आता ओटीटीवर हा चित्रपट पाहू शकणार आहेत.
झी-५ या ओटीटी प्लॅटफॉर्मने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची माहिती दिली आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करत त्यांनी असे म्हटले आहे की, “एक दूरदर्शी नेता आणि एक खरा नायक – सॅम. तुमच्या स्क्रीनवर येण्यासाठी सज्ज आहे.” ‘सॅम बहादुर’ हा चित्रपट येत्या २६ जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म झी-५ वर प्रदर्शित होणार आहे.
आणखी वाचा – यंदाच्या ‘ऑस्कर २०२४’चे नामांकन जाहीर, यादीत भारतीय चित्रपटाला स्थान नाही, वाचा संपूर्ण list
दरम्यान, ‘सॅम बहादुर’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ९३ कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटाची जगभरात १०० कोटींहून अधिक कमाई झाली. सॅम बहादुर या चित्रपटाची रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाबरोबर बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. तरीदेखील या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असल्याचे पाहायला मिळाले.