Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’च्या घरात अंकिता लोखंडे सुशांत सिंग राजपूतचा अनेकदा उल्लेख करताना दिसली. या प्रकरणावरून तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलेलंही पाहायला मिळालं आणि यावर प्रश्नही उपस्थित करण्यात आले. अंकिताने सांगितले की, ती फुटेजसाठी त्याचा उल्लेख करत नाही पण तिला सुशांतबद्दल बोलण्याचा अभिमान वाटतो. २१ जानेवारीला सुशांतचा वाढदिवस होता. यावेळी ‘बिग बॉस’च्या घरात अंकिताने पुन्हा एकदा त्याची आठवण काढली. यादरम्यान अरुण माशेट्टी याने पहिल्यांदाच सुशांतशी संबंधित एक मजेशीर गोष्ट सांगितली.
‘बिग बॉस’च्या शेवटच्या भागात अंकिता लोखंडे तिचा पती विकी जैन, अरुण व अभिषेकसह बसून गप्पा मार्ट होती. यादरम्यान अरुण तिला म्हणाला, “मी सुशांत भाईबद्दल कधीच बोललो नाही कारण तुझा त्याच्याबरोबर भूतकाळ आहे आणि मला वाटतं त्याच्या आठवणींनी तुला दुःख होईल. पण मी तुला एवढेच सांगू इच्छितो की, माझ्या पत्नीच्या देशात (फ्रान्स) मध्ये सुशांत भाईच्या निधनाच्या बातम्या फ्रेंच वा अरबी भाषेत सर्वत्र अनुवादित झाल्या. ही बातमी कळताच तेथील देशवासीयही रडले आणि दु:खी झाले. तिकडे सुद्धा नेमकं काय झालं हा प्रश्न साऱ्या चाहत्यांना पडला होता”.
यावर अंकिता असं म्हणताना दिसत आहे की, “आज सुशांतचा वाढदिवस आहे”. सुशांत हा ग्लोबल स्टार असल्याचेही विकी जैन या संवादादरम्यान म्हणाला. अंकिताचा पती विकी जैनचा ‘बिग बॉस’मधील प्रवास संपला आहे. या शोमध्ये अरुण माशेट्टी, अंकिता लोखंडे, मुन्नवर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार हे पाच स्पर्धक फिनालेमध्ये पोहोचले आहेत.
‘बिग बॉस’मधील स्पर्धकांनी पत्रकार परिषदेत अंकिता लोखंडे ‘बिग बॉस १७’ मध्ये इतर स्पर्धकांशी दिवंगत सुशांत सिंह राजपूतबद्दल का बोलते, हा तिच्या गेम शोचा भाग आहे का, असं विचारण्यात आलं. यावेळी उत्तर देत अंकिता म्हणाली, “मी नेहमी सुशांतबद्दल फक्त चांगल्याच गोष्टी बोलले, कारण मला वाटतं की या प्लॅटफॉर्मवरून मी त्याच्याबद्दल काही चांगल्या गोष्टी सांगू शकते तर मी ते का सांगू नये? त्याने चांगली कामं केली आहेत. आणि मी याबद्दल बोलू शकते कारण मला त्याच्याबद्दल माहित आहे आणि मी त्याचा प्रवास जवळून पाहिला आहे. त्यामुळे त्याच गोष्टी मी त्याच्याबद्दल बोलत असते”.