ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचं वयाच्या ८२व्या वर्षी निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. बुधवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मंगळवारी हैदराबाद येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मालिनी राजूरकर यांच्या निधनाची बातमीची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत. (Singer Malini Rajurkar Death)
मालिनी राजूरकर यांचे ‘ख्याल’ व ‘टप्पा’ या गायन प्रकारांवर विशेष प्रभुत्व असलेले पाहायला मिळाले. अभिजात संगीताच्या प्रचारासाठी त्या कायम प्रयत्नशील राहिल्या. ग्वाल्हेर घराण्याची परंपरा समृद्ध करणाऱ्या वझेबुवा आणि त्यांचे गुरुजी निसार हुसेनखाँ, भूगंधर्व रहिमतखाँ, वासुदेवबुवा जोशी, पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर, ओंकारनाथ ठाकूर यांची परंपरा कायम ठेवणारा आवाज म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर पसरली होती.
मालिनी राजूरकर यांचा जन्म १९४१ मध्ये अजमेर येथे झाला. अजमेर येथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. शिक्षण घेत असताना त्यांनी गणित या विषयात पदवी संपादन केली. त्यांनतर त्यांनी अजमेरमधील सावित्री माध्यमिक शाळा व महाविद्यालयात तीन वर्ष गणिताचे अध्यापन केले. शिवाय कला विषयात तीन वर्षांची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आणि त्यांनी आपली संगीताची आवड पुढे जोपासली. अजमेर संगीत महाविद्यालयात गोविंदराव राजूरकर आणि त्यांचा पुतण्या वसंतराव राजूरकर यांच्याकडे संगीताचे पुढील धडे घेतले. पुढे वसंतराव राजूरकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
अतिशय तत्वनिष्ठ, सांगीतिक मूल्यांशी तडजोड न करणाऱ्या अशा कलावंत आज काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. अनेक कलाकार मंडळींनी मालिनी ताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. अशातच प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे याने देखील मालिनी ताईंना श्रद्धांजली वाहणारी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुबोध भावे हा मालिनी ताईंसोबत पाहायला मिळतोय. पोस्ट शेअर करत त्याने म्हटलं आहे की, “तुमच्या गाण्यावर अफाट प्रेम होतं मालिनी ताई. तुम्हाला प्रत्यक्ष भेटता आलं, तुमचा आशिर्वाद मिळाला हे माझं भाग्य. तुमच्या जाण्याने अत्यंत साधेपणाने आपलं आयुष्य जगणारा पण गाण्याने कित्येकांना श्रीमंत करणार्या एका असामान्य कलाकाराची आणि माणसाची उणीव आम्हाला कायम जाणवत राहील. तुम्हाला भावपूर्ण श्रध्दांजली मालिनी ताई.”