Prashant Damle Mother Passed Away : मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील मोठं नाव म्हणून प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्याकडे पाहिले जाते. एक दोन नव्हे तर तब्बल तीन दशक प्रशांत दामले यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. मात्र आता प्रशांत दामले यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशांत दामले यांच्या मातोश्री विजया दामले यांचं निधन झालं आहे. आज सकाळी १० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रशांत दामले यांच्या मातोश्री विजया दामले या मुंबईतील अंधेरी येथे राहत होत्या. राहत्या घरातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्यावर आज आंबोली येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान प्रशांत दामले हे कामानिमित्त मुंबईबाहेर होते. आईच्या मृत्यूची बातमी समजताच ते मुंबई येथील घराकडे तातडीने यायला देखील निघाले.
तीन दशकांहून अधिक काळ यांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. त्यांच्या नाटकांचा चाहतावर्ग मोठा आहे. दामलेंच्या अनेक नाटकांचे ५ हजारांहून अधिक प्रयोग झाले आहेत. प्रशांत दामले यांनी आपल्या कामातून वेळ काढत कुटुंबासोबत वेळ घालवत असत.
प्रशांत दामले हे केवळ एक अभिनेताच नाही तर एक उत्तम माणूस देखील आहेत. त्यांनी प्रशांत फॅन फाऊंडेशन नावाचे स्वतःचे फाउंडेशन सुरू केले आहे ज्याद्वारे ते समाजाच्या कल्याणासाठी सामाजिक कार्य करत असतात. स्वतःपेक्षा अधिक इतरांची काळजी करणाऱ्या प्रशांत दामले यांच्यावरील आईचे छत्र हरपले आहे. १२५०० प्रयोगांचा पल्ला गाठणारं दर्जेदार व्यक्तिमत्व मराठी नाटककार आणि दिग्गज अभिनेते प्रशांत दामले हे तत्व पाळून घरच्या संस्काराचा आदर करून मोठे झाले आहेत. त्यांच्या यशात अर्थात त्यांच्या मातोश्रींचा आशीर्वाद कायम असेल.