Vijay Kadam Died : विनोदाचं अचूक टायमिंग जपत जवळपास चार दशकं मराठी मनोरंजन विश्व गाजवणारे हरहुन्नरी अभिनेते विजय कदम यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांचे राहत्या घरीच निधन झाले. गेले अनेक दिवस ते कर्करोगाशी झुंज देत होते. अखेरीच अभिनेत्याची कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली आणि ते काळाच्या पडद्याआड गेले. विजय कदम यांच्या पार्थिवावर ओशिवरा स्मशानभूमी येथे आज दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारे विजय कदम काही काळ मनोरंजन सृष्टीपासून लांब होते आणि याचं कारण म्हणजे त्यांचं आजारपण. त्यावेळी विजय कदम यांनी कर्करोगाशी यशस्वी झुंज दिली असून त्यांची ही झुंज अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. यादरम्यान विजय कदम यांना त्यांच्या कुटुंबियांची मोलाची साथ मिळाली. कर्करोग या आजाराशी लढा देताना त्यांना वाईट प्रसंगाचा सामना करावा लागला.
विजय कदम यांना कर्करोगाशी लढा देणं हे एक वाईट स्वप्न वाटलं. मात्र ते या वाईट स्वप्नांतून बाहेरही पडले. मानसिकदृष्ट्या त्यांच्यासह त्यांचे कुटुंबही खंबीर राहिले. कर्करोगादरम्यान उपचार घेताना त्यांना किमोथेरपी व दोनदा सर्जरीही करावी लागली. याबाबत त्यांनी ‘इट्स मज्जा’ युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. यावेळी त्यांनी त्यांच्या आजारपणाबद्दल आणि या आजारपणातल्या त्यांच्या संघर्षाबद्दल सांगितले.
यावेळी विजय कदम यांनी असं म्हटलं होत की, “याचे सगळे श्रेय माझी पत्नी व माझा मुलगा गंधार यांची साथ मिळाली. हे दोघे माझ्यामागे खंबीरपणे उभे राहिले. तसंच हे एक वाईट स्वप्न समजून मी यातून लवकर बाहेर पडलो. शक्यतो यातून लवकर बाहेर पडत नाहीत. पण मी पडलो आणि नशिबाने चांगले डॉक्टर मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे व माझ्या पत्नीच्या साथीमुळे मी यावर यशस्वी मात करु शकलो असं मला वाटतं”. आज विजय कदम आपल्यात नाहीत याचे दुःख कायम आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीतही शोककळा पसरली आहे.