‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहे. मालिकेत एकामागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. या मालिकेत अधिपती व अक्षरा यांच्यातील प्रेम बहरताना पाहायला मिळत आहे. मालिकेत अधिपतीच्या भूमिकेत अभिनेता हृषीकेश शेलार पाहायला मिळत आहे तर अक्षराच्या भूमिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे दिसत आहे. हृषीकेशने आजवर अनेक मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेआधी हृषीकेशची ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका विशेष गाजली. (Hrishikesh Shelar Wedding Anniversary)
सोशल मीडियावर हृषीकेश बऱ्यापैकी सक्रिय असतो.नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. विशेषतः हृषीकेश त्यांच्या कुटुंबाबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ पोस्ट करताना दिसतो. चित्रीकरणाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत हृषीकेश नेहमीच त्याच्या कुटुंबाला वेळ देताना दिसतो. अशातच हृषिकेशने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हृषीकेशने शेअर केलेली ही पोस्ट त्याच्या लग्नाला सात वर्ष पूर्ण झालं असल्याचं सांगत आहे. ‘सात वर्षे एकत्र’ असं म्हणत त्याने बायकोबरोबर व त्याच्या गोंडस लेकीबरोबरचे फोटो पोस्ट केले आहेत. सात वर्षांपूर्वी हृषीकेश खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकला. त्याने अभिनेत्री नेहासह लग्नगाठ बांधली. वर्षभरापूर्वी ऋषिकेश व नेहा आई-बाबाही झाले. त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं. मुलीच्या जन्मानंतर अभिनेता खूप खुश असलेला दिसला. मोठ्या दणक्यात त्यांनी त्यांच्या लेकीचा नामकरण सोहळा पार पाडला.
हृषीकेशने लग्नाला सात वर्षे पूर्ण होताच बायको व लेकीबरोबर फिरतानाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हृषीकेशची लेक खूपच क्युट व नाजूक दिसत आहे. हृषीकेशच्या या गोंडस लेकीचे फोटो साऱ्यांच्या पसंतीस पडत आहेत. चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत हृषीकेश व नेहाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर त्यांची लेक रुहीचे कौतुक केले आहे.