Tula Shikvin Changlach Dhada : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका. मालिकेत घडणाऱ्या घडामोडी आणि मालिकेत येणारे नवनवीन ट्वीस्ट हे प्रेक्षकांना कथानकाशी नेहमीच खिळवून ठेवतात. या मालिकेत येणाऱ्या अनेक नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.त्यामुळे आगामी कथानकाविषयी प्रेक्षकांना कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. मालिकेत काही दिवसांपूर्वी अक्षरा व अधिपती यांच्या आयुष्यात चारुलताची एन्ट्री झालेली पाहायला मिळाली. चारुलताने घरात एन्ट्री केल्यानंतर अक्षरा व चारुहास यांनी तिला स्वीकारलं आहे. पण अधिपती चारुलताचा आई म्हणून स्वीकार करण्यास अजूनही तयार नाही. (Tula Shikvin Changlach Dhada Serial Update)
एकीकडे पत्नीच्या पुन्हा येण्याने चारुहासला प्रचंड आनंद होतो पण, दुसरीकडे अधिपती भुवनेश्वरी घरात नसल्याने उदास होतो. त्याने अद्याप चारुलताचा आई म्हणून स्वीकार केलेला नाही. या चौघांचे अंतर्गत वाद सुरू असताना दुसरीकडे दुर्गेश्वरी, चंचला यांचं नवनवीन डाव आखून अक्षरा व चारुलताची कोंडी करण्याचं कामदेखील सुरूच आहे. नुकताच मालिकेत नवरात्रोत्सव साजरा झाला असून यात अधिपती व अक्षरा यांनी बाजी मारली. त्यानंतर आता मालिकेत दसऱ्याचा उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त सूर्यवंशींच्या घरात धामधूम सुरु आहे.
अशातच सोमवारच्या भागात चारुहासने चारुलतासाठी अक्षराच्या मदतीने सोन्याचा हार घेतला आहे. यासाठी चारुहास अक्षराला बोलवून घेतो. यावेळी ती बाजारात जात असताना तिला अधिपतीही मिळतो. अधिपतीही अक्षरासाठी काहीतरी घ्यायला गेलेला असतो. मात्र तो तिला त्याबद्दल काही सांगत नाही. अशातच आजच्या भागात अधिपती भुवनेश्वरीच्या आठवणीत अक्षराला भुवनेश्वरीसारखे दागिने परिधान करायला सांगणार आहे. याचा एक प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. झी मराठीच्या सोशल मीडियावर या नवीन ट्विस्टचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
या नवीन प्रोमोमध्ये अधिपती अक्षराला असं म्हणतो की, “आईसाहेब आता या घरात नाहीत. पण तुम्ही तरी त्यांच्यासाठी तयार व्हावं म्हणून मी हे सगळं आणलं”. त्यानंतर अक्षरा भुवनेश्वरीच्या लूकमध्ये अधिपतीसमोर येते. त्यामुळे आता मालिकेत पुढे नक्की काय होणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तसंच अक्षराला भुवनेश्वरीच्या लूकमध्ये पाहून घरातील ईतरांच्या काय प्रतिक्रिया असणार? हे पाहणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे.