सायली-अर्जुन या दोघांचं एकमेकांवर मनापासून प्रेम असतं. मात्र, अद्याप या दोघांनी एकमेकांवर असलेल्या प्रेमाची कबुली दिलेली नाही. या दोघांचं लग्न कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पद्धतीने झालेलं असतं. त्यामुळे एकमेकांसमोर प्रेमाची कबुली कशी द्यायची असा विचार करून अर्जुन-सायलीने आजवर मौन बाळगलेलं असतं. हे दोघे एकमेकांवर प्रेम करत आहेत, मात्र यापैकी कुणीच कोणाला आपलं प्रेम व्यक्त करत नाहीयेत. अशातच येत्या दिवाळीत हे दोघे एकमेकांना त्यांचे प्रेम व्यक्त करणार आहेत, पण यात काहीना काही ट्विस्ट येणारच आहे आणि या ट्विस्टचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.
स्टार प्रवाह वाहिनीने ‘ठरलं तर मग’ या मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. या नवीन प्रोमोमध्ये सायली कुसुमला अर्जुनविषयी असं म्हणते की, “त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे”. यावर कुसुम तिला असं म्हणते की, “आल्यापासून फक्त अर्जुनसर.. अर्जुनसर… असा जप सुरु आहे. आता वेळ आली आहे. तुझ्या मनातलं सगळं त्यांना सांगून टाक”. यावर सायली कुसुमला म्हणते की, “ठरलं तर मग… मी या दिवाळी अर्जून सरांना माझ्या मनातलं सगळं सांगून टाकणार”. त्यांच्यातील हे संभाषण सुरु असतानाच अर्जुन सायलीच्या खोलीच्या दिशेने येत असतो.
आणखी वाचा – Bigg Boss 18 मध्ये प्रेमाचे वारे, ईशा-अविनाशचं फुलतंय नातं, जोडी जमणार का?
पुढे कुसुम सायलीला “त्यांच्या मनात तसं काही नसेल तर” असा प्रश्न विचारते. याचे उत्तर देत सायली असं म्हणते की, “मधूभाऊ बाहेर आल्यावर मी त्यांच्याबरोबर पुन्हा आश्रमात निघून जाणार”. सायली हेच म्हणणे अर्जुन खोलीच्या बाहेरून ऐकतो आणि तो तिच्याविषयी गैरसमज करुन घेतो की मधूभाऊ बाहेर आल्यावर सायली आपल्याला सोडून जाणार. त्यामुळे आता या दोघांमधील गैरसमजामुळे हे दोघे विभक्त होणार की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अनेकांनी तशा प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.
स्टार प्रवाह वाहिनीने शेअर केलेल्या या प्रोमोखाली मालिकेच्या प्रेक्षकांनी “अर्जुन चुकीच्या वेळीच कसा येतोस रे”, “सायली अर्जुनला सोडून जाणार नाही”, “अजून किती वेळ राहणार हा गैरसमज?”, अशा अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे आता सायली-अर्जुन यांच्यात बककी काय होणार? दोघे एकमेकांपासून खरंच दुरावा येणार का? की त्यांच्यातील प्रेम आणखी बहरणार? याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.