विश्वचषक २०२३चा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र यंदाच्या या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघाने ६ गडी राखून पराभव केला. यामुळे संपूर्ण देशभरात सध्या नाराजीचं वातावरण पसरलं आहे. क्रिकेटप्रेमींपासून अगदी कलाकार मंडळींपर्यंत हा नाराजीचा सूर पाहायला मिळाला. अनेकांनी याबाबतची पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. (Swapnil Rajshekhar Post On Worldcup)
दरम्यान विश्वचषक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचे आनंद साजरे करतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ऑस्ट्रेलिया संघाने विजेतेपद पटकावल्यानंतर केलेल्या पार्टीचेही अनेक फोटोस व्हायरल झाले. दरम्यान ड्रेसिंग रूममधील एका फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिशेल मार्श खुर्चीवर बसलेला असून त्याच्या हातात एक बाटली दिसत आहे. याशिवाय खुर्चीवर बसून त्याने चक्क विश्वचषकाच्या ट्रॉफीवर पाय ठेवला असल्याचं दिसत आहे.
हा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. हा फोटो व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला होता. दरम्यान एका मराठमोळ्या अभिनेत्यानेही संतापजनक पोस्ट शेअर केली आहे. तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेतील अभिनेत्याची पोस्ट लक्षवेधी ठरतेय. अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे.
स्वप्नील राजशेखर यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “आपल्यावर पूर्वापार झालेले ‘संस्कार’ पृथ्वीतलावर अस्तित्वात असलेल्या प्रत्येकाने ग्राह्यच मानावेत. त्यानुसारच जगावं अन्यथा याच हट्टाग्रहाने जगात दहशतवाद आणला असेल ना?!” असं म्हणत विश्वचषकाच्या ट्रॉफीचा अपमान केल्याचा फोटो त्यांनी पोस्ट केला आहे. अभिनेत्याच्या या पोस्टवर अनेक क्रिकेटप्रेमींनी कमेंट करत ऑस्ट्रेलिया संघाला ट्रोल केलं आहे.