झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चेत आहे. मालिकेत अक्षरा-अधिपती यांची जोडी प्रेक्षकांची अत्यंत आवडती जोडी बनली आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या कौतुकाला पात्र ठरला आहे. मालिकेतील अक्षराने म्हणजेच अभिनेत्री शिवानी रांगोळेने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. साधी, सोज्वळ मास्तरीनबाई प्रेक्षकांची आवडती झाली आहे. त्यामुळे शिवानी रांगोळे ही अभिनेत्री चाहत्यांमध्ये सतत चर्चेत राहत असते. अशातच आता पुन्हा एकदा शिवानी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे आणि याचं कारण म्हणजे अभिनेत्रीने नुकताच शेअर केलेला एक खास प्रसंग. (Shivani Rangole shares her flight experience)
शिवानी रांगोळेने नुकताच परदेश दौरा केला असून या परदेश दौऱ्यामध्ये तिला आलेला एक खास अनुभव तिने सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. त्याचबरोबर काही खास फोटोही शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिला प्रवासादरम्यान विमान कर्मचाऱ्यांकडून देण्यात आलेले गिफ्ट्स पाहायला मिळत आहेत. तसंच अभिनेत्रीचे कौतुक करणारी एक नोटही या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. या सर्वामुळे शिवानी रांगोळे भारावून गेली असून याबद्दल तिने खास पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “कितीही वेळा प्रवास केला तरी मुळात मी चिंताग्रस्त विमान प्रवास करणारी आहे. अशा वेळी एका परक्या देशात असताना जेव्हा आपल्याला ‘मास्तरीणबाई’ म्हणून हाक मारून, आपली काळजी घेतली जाते तेव्हा खूप छान वाटतं! आपलं काम, जे आपण आयुष्यभरासाठी निवडलं आहे, त्यातून पैशाबरोबर आनंद आणि समाधान मिळणं हे खूप दुर्मिळ असतं आणि ते आपल्या बाबतीत खरं आहे याचा वारंवार आनंद होतो”.
आणखी वाचा – अखेर प्रतीक्षा संपणार! ‘दहावी-अ’चा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी होणार ट्रेलर लाँच सोहळा
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत शिवानी रांगोळे साकारत असलेल्या अक्षराच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिनयासह शिवानी सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. ती तिच्या आयुष्यातील घडामोडी, सेटवरच्या गंमती-जमती नेहमीच सोशल मीडियावरुन शेअर करत असते. अशातच तिने शेअर केलेला एक फोटो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शिवानीने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.