झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ (Tula Shikvin Changalach Dhada) या मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील अधिपती व अक्षरा या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. या जोडीनं महाराष्ट्रातील जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. मालिकेतील कलाकारांचा अभिनय व मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट यामुळे प्रेक्षकांना ही मालिका भावते. अशातच काही दिवसांपूर्वी मालिकेत चारुलताची एन्ट्री झाली. अक्षराने स्वत:हून तिला घरी आणलं होतं. चारुहास-अक्षराने जरी चारुलताला स्वीकारलं असलं तरीही अधिपती काही केल्या तिला आई म्हणून स्वीकारण्यास तयार नसतो. (Tula Shikvin Changalach Dhada Serial Updates)
मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अक्षरा चारुलता व चारुहास यांचे पुन्हा लग्न लावण्याचे प्रयत्न करतानाचे पाहायला मिळत आहे. अशातच बाजारात गेलेल्या अक्षराला भुवनेश्वरीची पाठमोरी झलक दिसली. यावेळी अक्षराचे लक्ष भुवनेश्वरीच्या कानातल्यांवर गेलं होतं. तेव्हापासून तिला चारुलता व भुवनेश्वरी यांच्यात अक्षराच्या मनात संभ्रम तयार झाला होता. अशातच आता मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. या नवीन प्रोमोमध्ये अक्षराला भुवनेश्वरीच्या कानात दिसलेले कानातले चारुलताच्या कानात दिसले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून भुवनेश्वरीच सूर्यवंशींच्या घरी चारुलता होऊन वावरत आहे. अशातच अक्षराने भुवनेश्वरीला बाजारात पाहिल्यामुळे तिची शंका खरी ठरली आहे आणि ती या घडल्या प्रकाराबद्दल अधिपतीला सांगते. तसेच भुवनेश्वरीच खोटी चारुलता म्हणून वावरत असल्याने काही करून त्यांचं बाबांबरोबर लग्न होता कामा नये. आपण हे लग्न थांबवलं पाहिजे असंही अक्षरा अधिपतीला सांगते. त्यामुळे एकीकडे भुवनेश्वरी चारुलता म्हणून त्यांच्या लग्नाविषयी चारुहासला म्हणते की आपण आपलं लग्न अलीकडे घेऊयात तर अक्षरा त्यांचे लग्न मोडण्याचा विचार करत आहे.
त्यामुळे चारुलता आणि चारुहासचं लग्न अक्षरा थांबवू शकेल का? हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे. तसंच चारुलताचे सत्य आता अक्षरा सर्वांसमोर आणणार का? यात तिला अधिपतीची साथ मिळणार का? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मालिकेच्या आगामी भागातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आगामी भगांसाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत.