‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत एकामागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आली आहे. मालिकेतील अक्षरा-अधिपतीच्या जोडीला प्रेक्षकांनी अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक भागात प्रेक्षकांना नवीन काय पाहायला मिळणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच सध्या मालिकेत अक्षरा व अधिपती यांचा प्रेमाची कबुली देण्याचा सिक्वेन्स सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. (Tula Shikvin Changalach Dhada Promo)
अक्षरा व अधिपती दोघेही एकमेकांवरील प्रेमाची लवकरच कबुली देणार आहेत. अद्याप दोघांनीही त्यांच्या प्रेमाची कबुली दिलेली नसते. तर चारुहास अक्षराला तिच्या प्रेमाची जाणीव करून देतो आणि तिला समजावून सांगतो. त्यावर अक्षराही कबुली देण्यास तयार होते. तर एकीकडे अधिपतीही अक्षरावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेमाची कबुली द्यायची तयारी करत असतो. एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी दोघेही एकमेकांच्या नकळत लपूनछपून तयारी करत असतात.
अशातच मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अधिपतीचा वाढदिवस असतो. तेव्हा अक्षरा अधिपतीला औक्षण करायला येते. मात्र अधिपती म्हणतो की आजवर मला माझ्या वाढदिवसाला पहिलं औक्षण आईसाहेबच करतात. यावर अक्षरा त्याला बायको आल्यानंतर सगळंच बदलतं. आता तुमची बायको आहे तर मला औक्षण करू द्या, असं बोलते. अक्षरालाही वाईट वाटू नये म्हणून अधिपती तिच्याकडून औक्षण करून घेतो. त्यानंतर अक्षराने अधिपतीसाठी खास गिफ्ट आणलेलं असतं. ते गिफ्ट ती अधिपतीला देत वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. अक्षराने अधिपतीसाठी सुंदर असं फॉर्मल शर्ट आणलेलं असतं.
आता मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, अधिपती अक्षराने गिफ्ट केलेलं शर्ट घालून येतो. तेव्हा अक्षरा त्याच कौतुक करते आणि प्रेमाची कबुली द्यायला याहून चांगला दिवस नाही म्हणून काहीतरी सांगायचं आहे असं अधिपतीला सांगते. त्यानंतर अक्षरा अधिपतीला प्रेमाची कबुली देताना दिसत आहे. आता अक्षराने अधिपतीसमोर प्रेम व्यक्त केलं की नाही हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.