सध्या मराठी सिनेसृष्टीत लग्नसराई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. नुकतीच अभिनेता प्रथमेश परबने क्षितिजा घोसाळकरसह लगीनगाठ बांधली. त्या पाठोपाठ आता आणखी एक लोकप्रिय जोडी विवाहबंधनात अडकली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तितीक्षा तावडे व अभिनेता सिद्धार्थ बोडके यांचा विवाहदेखील मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. सिद्धार्थ व तितिक्षा गेली काही वर्ष एकमेकांना डेट करत होते. दोघांनी एकत्र फोटो शेअर करत त्यांच्या नात्याबद्दल चाहत्यांना सांगितलं होतं. आता अखेर त्यांचं अनेक वर्षांचं नातं एका बंधनात अडकलं आहे. (Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding Updates)
या विवाहसोहळ्याला त्यांच्या कुटुंबीयांबरोबरच मित्रपरिवारालाही आमंत्रण देण्यात आलं होतं. नुकतेच तितीक्षा व खुशबूच्या लग्नसोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. यावेळी दोघांचाही पारंपरिक लूक अधिक लक्षवेधी ठरत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात दोघांनी त्यांचा शाही विवाहसोहळा उरकला आहे. एकमेकांना वरमाला घालत असताना तितीक्षाला अश्रूही अनावर झालेले पाहायला मिळाले. लग्नासाठी तितीक्षाने मोती रंगाची नऊवारी साडी व त्यावर कॉन्ट्रास्ट सोनेरी रंगाचा ब्लाउज परिधान केला. तर सिद्धार्थने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली आहे. तितीक्षा व सिद्धार्थच्या लग्नात करवली बाई भाव खाऊन गेली असल्याचं पाहायला मिळालं.
तितीक्षाची बहीण खुशबू तावडेचा बहिणीच्या लग्नातील खास लूक साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. बहिणीच्या लग्नासाठी खुशबूने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. तसेच मोजकेच दागिने घालत, सौम्य मेकअप लूकमध्ये ती दिसली. बहिणीच्या लग्नातील खुशबूचा हा साधा लूक साऱ्यांचाच विशेष भावत आहे. लग्न लागतानाही करवली म्हणून खुशबू बहिणीच्या पाठी उभी असलेली पाहायला मिळाली. खुशबू व तितीक्षा या दोन्ही बहिणीचं खूप खास बॉण्डिंग आहे. दोघांच्या बॉण्डिंगबाबत सगळ्यांनाच माहित आहे.

तितीक्षा व खुशबू या दोघीही मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. तितीक्षा सध्या ‘झी मराठी’वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी गोष्ट’ या मालिकेत नेत्राची भूमिका करत आहे. तर खुशबू ही ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. दोघीही सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांबरोबर फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात.