सध्या सिनेसृष्टीत लगीन घाई सुरु असताना प्रेक्षकांची लाडकी मराठमोळी व लोकप्रिय जोडी लग्नबंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहे. ही लाडकी जोडी म्हणजे अभिनेत्री तितीक्षा तावडे व अभिनेता सिद्धार्थ बोडके. सिद्धार्थ लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आला आहे. दोघांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचेही पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींचे अनेक फोटो धुमाकूळ घालताना दिसत आहेत. (Titeeksha Tawde And Siddharth Bodke Haladi Ceremony)
नुकताच तितीक्षा व सिद्धार्थ यांचा साखरपुडा समारंभ पार पडला. साखरपुड्यातील खास फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी तितीक्षा व सिद्धार्थचा लूक प्रेक्षकांना अधिक भावला. तितीक्षाने साखरपुड्यासाठी नेसलेल्या डिझायनर साडीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं तर सिद्धार्थचा पारंपारिक टच असलेला कुर्ता पायजमा ही अधिक खास होता. अगदी आनंदात थाटामाटात दोघांचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला. तितीक्षा व सिद्धार्थच्या साखरपुड्यानंतर दोघांच्या हळदी समारंभाचे फोटो समोर आले आहेत.
एकमेकांच्या नावाची हळद लागत अगदी शाही थाटामाटात त्यांनी त्यांचा हळदी समारंभ पार पाडला. नातेवाईक, कुटुंबीय व कलाकार मंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. अनेक कलाकारांनीही सिद्धार्थ व तितीक्षाच्या हळदीत धमाल-मस्ती केलेली पाहायला मिळाली. शिवाय सिद्धार्थचा त्याच्या वडिलांबरोबरचा हळदीतील डान्सही तुफान व्हायरल होत आहे. हळदी समारंभासाठी दोघांनी पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. यावेळी तितीक्षाने पांढऱ्या रंगाची साडी तर सिद्धार्थने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला होता. शिवाय तितीक्षाच्या खास लूकमधील आकर्षणाची बाब म्हणजे तिनं घातलेले फुलांचे दागिने. नववधूवराच्या लूकमध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत होते.
हळदी समारंभात एकमेकांना हळद लावत सिद्धार्थ व तितीक्षा थिरकताना दिसले. रोमँटिक पोज देत दोघांचा हळदी समारंभातील एक व्हिडीओ त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. शिवाय या दोघांच्या हळदी समारंभाला सिनेसृष्टीतील कलाकार मंडळीही उपस्थित होती. यावेळी या कलाकारांचाही डान्स पाहायला मिळाला.