‘बिग बॉस’हिंदी मध्ये झळकलेले एक लोकप्रिय जोडी म्हणजे गायक राहुल वैद्य व अभिनेत्री दिशा परमार. ‘बिग बॉस’च्या घरात राहुल व दिशा यांचं प्रेम जुळलं. ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर दोघांनी त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली देत विवाहसोहळा उरकला. त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. लग्नगाठ बांधल्यानंतर दोघांनी त्यांच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी शेअर केली. राहुल व दिशा आई-बाबा झाल्याची गुडन्यूज त्यांनी चाहत्यांसह शेअर केली. (Rahul Vaidya And Disha Parmar)
गेल्या वर्षी २० सप्टेंबर रोजी दिशाने आपल्या मुलीला जन्म दिला. तेव्हापासन राहुल व दिशा यांनी आपल्या लाडक्या लेकीचा चेहरा दाखवला नव्हता. त्यामुळे त्यांच्या अनेक चाहत्यांना नव्याला पाहण्याची उत्सुकता लागून राहिली होती. काही दिवसांपूर्वी राहुल व दिशा यांनी मुंबई विमानतळावर पापाराझींना आपल्या मुलीची ओळख करून दिली होती. यावेळी पापाराझींनीही नव्याचे काही खास फोटो त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करत सोशल मीडियावरुन पोस्टही केले.
लेकीच्या जन्मांनंतर राहुल व दिशा खूपच खुश असलेले पाहायला मिळत आहेत. अशातच लेक नव्याला घेऊन ते महालक्ष्मी देवीचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात पोहोचले. याचा एक व्हिडीओ राहुलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहे. यांत राहुलने लेकीला उचलून घेतलेलं पाहायला मिळत आहे, तर मंदिराबाहेर गोशाळेत दिशा गायीला गोंजारताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत राहुलने या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हा व्हिडीओ शेअर करत राहुलने, “माझा जन्म झाला तेव्हा माझ्या आईने मला या महालक्ष्मी मातेच्या चरणी ठेऊन आशीर्वाद घेतला होता. तसेच दिशा व मी आमची मुलगी नव्या हिला माताजींच्या चरणी ठेवून आशीर्वाद घेतले आहेत. मंदिराच्या आवारात गोशाळा आहे. त्याचा हा व्हिडीओ”, असं म्हटलं आहे.