सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक जोड्या लग्नबंधनात अडकत आहेत. शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरे, गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर, स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी या जोड्या काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकल्या. यानंतर आता मराठी सिनेसृष्टीतील आणखी एक जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. प्रथमेश परब, पूजा सावंत या कलाकारांचीही लगीनघाई सुरु आहे. तर याचबरोबर टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडकेही लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. (Siddharth Bodke And Titeeksha Tawde Wedding)
गेल्या अनेक दिवसांपासून सिद्धार्थ व तितीक्षा या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु होत्या. अखेर काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. तितीक्षाने इन्स्टाग्रामवर सिद्धार्थबरोबरचा क्युट फोटो शेअर केला आहे. थेट केळवणाचे फोटो शेअर करत दोघांनी प्रेमात असल्याची कबुली देत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे संकेत दिले. तेव्हापासून दोघांच्या लग्नाची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.
तितीक्षा व सिद्धार्थच्या घरी लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. सिद्धार्थने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक स्टोरी पोस्ट करत याबाबतचे अपडेट दिले आहेत. जात्यावर हळदकुंड बांधलेला एक फोटो त्याने शेअर करत लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचं समोर आलं आहे. शिवाय तितीक्षा व सिद्धार्थ सध्या केळवणाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील इशा डे व अभिनेत्री आकांक्षा गाडे या दोघींनी मिळून तितीक्षा व सिद्धार्थच्या केळवणाचा कार्यक्रम पार पाडला.
याआधीही तितीक्षा व सिद्धार्थच्या केळवणाचे फोटो समोर आले. अशातच आता त्यांच्या लग्नापुर्वीच्या विधींनादेखील सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. सिद्धार्थ व तितीक्षा यांच्या शुभविवाह ठाणे येथे पार पडणार असल्याची चर्चा आहे. तितीक्षा व सिद्धार्थ ल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत प्रेम व्यक्त करत होते. पण त्यांनी कधीच आपल्या नात्याची माहिती उघडपणे सांगितली नाही. ‘असे हे कन्यादान’, ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकांमध्ये तितीक्षा व सिद्धार्थ यांनी एकत्र काम केलं आहे.