देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राज्यात आज पाचव्या टप्प्यातलं मतदान सुरु आहे. महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. मुंबईच्या सहा जागांसह राज्यातील एकूण १३ मतदारसंघात आज मतदान होत आहे. ईशान्य मुंबईत जोरदार मतदान सुरु आहे. यात मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांसह कल्याण, ठाणे, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे याठिकाणी मतदान होत आहे. मतदान केंद्राबाहेर मतदान सुरु असून सेलिब्रिटी मंडळीही मतदानासाठी रांगेत उभे आहेत. (Marathi Celebrity Voting Loksabha Election)
बॉलिवूड कलाकारांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे, तर मराठी कलाकारही त्यांचा मतदानाचा हक्क बजावत आहेत. या कलाकारांमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता गौरव मोरेनेही मतदान केलं आहे. सोशल मीडियावरुन मतदानानंतरचा फोटो शेअर करत त्याने खास कॅप्शन देत म्हटलं की, “मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे आणि संविधानाने दिलेला हा आपला अधिकार आहे. त्यामुळे चला मतदान करुया”, असं म्हणत त्याने पोस्ट शेअर केली आहे.

तर “मतदान हा आपला हक्क आहे आणि मतदान ही आपली जबाबदारी आहे”, असं म्हणत रवी जाधवने मतदानाचा हक्क बजावला आहे. “मी माझा मतदानाचा अधिकार बजावून आले, तुम्ही ही केलेत ना मतदान?”, असं विचारत सुकन्या मोने यांनी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये मतदान केल्याची हातावरील खून दाखवत त्यांनी फोटो पोस्ट केला आहे. “हा दिवस कुटुंबाबरोबर साजरा केला. तुम्हाला हा विशेषाधिकार ५ वर्षातून एकदा मिळतो”, असं म्हणत सुनील बर्वेने सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी यांनीदेखील बजावला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांच्याबरोबर त्याचे वडीलही मतदानासाठी आले होते. वडिलांचा हात फ्रॅक्चर असल्याचं दिसत आहे. असं असूनही त्यांनी मतदानाचा हक्क बजावत आपलं कर्तव्य पार पाडलं आहे.

“महत्वाचा निरोप. ज्यांची नावे मतदार यादीतून डिलीट झाली आहेत, म्हणजे यादीत नावावर डिलीटेड असा शिक्का लागला आहे. ते लोक मतदान केंद्रावर form no 17 भरुन आणि आपले मतदान कार्ड दाखवून मतदान करु शकणार आहेत.तरी विनंती आहे की ज्यांची नावे यादीमध्ये दिसत नाहीत त्यांनी मतदान केंद्रावर येऊन वरील प्रक्रिया फॉलो करावी आणि मतदानाचा हक्क बजवावा. आठवणीने मतदान करावे आणि भरभरुन करावे”, असं म्हणत अदिती सारंगधरने मतदानाचा हक्क बजावला असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, स्पृहा जोशी या कलाकारांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे.