बॉलिवूडमधील सध्या ‘सिंघम अगेन’, ‘भूलभूलय्या’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. आता लवकरच हे चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीस येतील. नोव्हेंबर महिना संपण्यास आता काहीच दिवस बाकी आहेत. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. गुन्हेगारी, सस्पेन्स, रोमान्स अशा अनेक पठडीतील अनेक चित्रपट तसेच सिरिज बघायला मिळणार आहेत. तमन्ना भाटिया, जिमी शेरगिल, अविनाश तिवारी यांच्या मुख्य भूमिका असणारा ‘सिकंदर का मुकद्दर’ हा चित्रपट भेटीस येणार आहे. तसेच दाक्षिणात्य सुपरस्टार दुलकर सलमान यांचा ‘लकी भास्कर’देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान कोणते चित्रपट व सीरिज भेटीला येणार आहेत? त्याबद्दल आता जाणून घेऊया. (OTT movie release)
दाक्षिणात्य चित्रपट ‘लकी भास्कर’ हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. दुलकर सलमान यांची मुख्य भूमिका या चित्रपटात होती. तसेच अभिनेत्री मिनाक्षी चौधरीदेखील दिसून आली होती. या चित्रपटाला खूप पसंती मिळाली होती. हा चित्रपट २८ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
अभिनेता जिमी शेरगिल, तमन्ना भाटिया, अविनाश तिवारी यांची मुख्य भूमिका असणारा ‘सिकंदर का मुकद्दर’ हा चित्रपट २९ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. हा एक क्राइम थ्रीलर चित्रपट आहे. ‘अवर लिटिल सीक्रेट’ हा एक हॉलिवूड रोमॅंटिक सिनेमा आहे. यामध्ये लिंडसे लोहानने एव्हरी व इयान होर्डिंगने लोगन यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट खूप रोमॅंटिक आहे. २७ नोव्हेंबर रोजी तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
‘हार्ड नॉर्थ’ ही एक सर्वायकल डॉक्युमेंट्री सीरिज आहे. आठ एपिसोड मध्ये ही सीरिज दाखवण्यात आली आहे. प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ही सीरिज बघायला मिळणार आहे. २९ नोव्हेंबरपासून ही सीरिज पाहता येईल. तुम्हाला साऊथ कोरियन चित्रपट बघायला आवडत असतील तर ‘द ट्रंक’ हा एक रहस्यपट तुम्ही पाहू शकता. २९ नोव्हेंबरपासून ही सीरिज तुम्हाला नेटफ्लिक्सवर पाहता येईल. तसेच ‘द मॅडनेस’, ‘द पॅरिस ख्रिसमस वॉल्ट्स’, ‘द स्नो सिस्टर’ हे चित्रपटही भेटीला येणार आहेत.