दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूपासून विभक्त झाल्यानंतर तीन वर्षांनी अभिनेता नागा चैतन्य आता त्याच्या आयुष्याची पुन्हा एकदा नवीन सुरुवात करत आहे. नागा चैतन्य व समंथा रुथ प्रभू यांनी २०१७ मध्ये लग्न केले आणि २०२१ मध्ये वेगळे झाले. त्यानंतर आता अभिनेता नागा चैतन्य शोभिता धुलिपालाबरोबर ०४ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. अशातच अभिनेत्री समंथा रुथ प्रभू घटस्फोटानंतर घडलेल्या गोष्टींबद्दल मोकळेपणाने बोलली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिने घटस्फोटाबद्दल भाष्य केलं. यावेळी तिने हे सर्व स्वीकारल्याचे सांगितले. (Samantha Ruth Prabhu on Divorce)
‘गलाटा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत समंथा रुथ प्रभूला विचारण्यात आले की तिने तिच्या वेडिंग गाऊनचे रूपांतर ड्रेसमध्ये का केले? यावर ती म्हणाली, “जेव्हा एखादी महिला घटस्फोटातून जाते तेव्हा तिच्याशी खूप लाजिरवाणी आणि कलंक असणारी गोस्त जोडली जाते. तेव्हा माझ्याबद्दल खूप काही बोललं गेलं. माझ्याबद्दल टीका टिप्पणी केली गेली. लोकांनी मला सेकंड हँड म्हटलं. त्याचे (नागा चैतन्य) आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले. तुम्हाला एका कोपऱ्यात ढकलले जाते. तुम्हाला अपयश आल्यासारखे वाटू लागते. तुम्ही आधी लग्न केले होते पण आता नाही याची लाज वाटू लागते”.
यापुढे अभिनेत्री म्हणाली की, “सुरुवातीला मला थोडं वाईट वाटत होतं. कारण त्याच्याशी माझे भावनिक संबंध जोडले होते. मी घटस्फोटित आहे. मात्र आता मला कोपऱ्यात बसून रडायचे नाही आणि माझे जगणे मला विसरायचे नाही. माझ्यात कोणताही वेगळा बदल नव्हता. पण हे सगळं माझ्या बाबतीत घडलं होतं याचं मला वाईट वाटलं. अर्थात यामुळे माझे आयुष्य संपले नाही. मी आता खूप आनंदी आहे आणि चांगले काम करत आहे”.
याचपुढे समंथाने तिच्या व नागा चैतन्यच्या बाळाबद्दलही भाष्य केलं. समंथा रुथ प्रभूने नागा चैतन्यबरोबर त्यांच्या बाळाची योजना केली होती. याबद्दल अभिनेत्री असं म्हणाली की, “एक तारीखही निश्चित करण्यात आली होती की, त्यावेळीच आम्ही या मुलाला या जगात आणतील. पण हे होऊ शकले नाही”. काही दिवसांपूर्वी समंथाने आई होण्यासाठी खूप उत्साहित आहे. तिला अजूनही आई व्हायचं आहे. सध्या ती अविवाहित असून कामावर लक्ष केंद्रित करत आहे असं म्हटलं होतं.