Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य आणि प्रेक्षक यांच्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे कार्यक्रमाचा सूत्रसंचालक. मागील पर्वात आपल्या ठाम मतांमुळे, रोखठोक भूमिका आणि तितक्याच प्रेमळ स्वभावामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारे सुपरस्टार रितेश देशमुख यंदाही ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचे सूत्रसंचालन करत आहेत. कधी मित्र, कधी मार्गदर्शक तर गरज पडल्यास कडक शिस्तीची भूमिका घेत रितेशने मागील सीझनमध्ये सदस्यांना आरसा दाखवला होता. हेच चित्र यंदाही पाहायला मिळणार आहे.
‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ येण्याआधीच संपूर्ण महाराष्ट्रात स्पर्धकांबाबत चर्चा आणि तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना रितेश देशमुख म्हणाले, “बिग बॉसचं घर म्हणजे रोज नवं वळण आणि नवं आव्हान. पुन्हा एकदा या शोचं सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाल्याचा मला खूप आनंद आहे. यंदा कुठलं दार कुणाचं नशीब उघडेल, हे कुणालाच माहीत नाही. राडा, धुरळा, भावना आणि मस्ती हे सगळं काही यंदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.”
यंदाच्या सीझनची थीम आणि संकल्पनेबद्दल बोलताना मराठी क्लस्टरचे एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट सतीश राजवाडे यांनी सांगितलं की, मराठी प्रेक्षक अतिशय चोखंदळ असल्याने यंदा केवळ खेळ नव्हे, तर संपूर्ण अनुभव अधिक धारदार करण्यात आला आहे. २१ ते ५५ वयोगटातील विविध विचारसरणीचे स्पर्धक यंदा घरात पाहायला मिळणार असून, “दार उघडणार… नशिबाचा गेम पालटणार!” ही थीम सीझनला वेगळं वळण देणार आहे.
१३ हजार चौरस फूट भव्य घर, १६ हून अधिक स्पर्धक आणि प्रत्येक दारामागे लपलेले ट्विस्ट यामुळे ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ अधिक बेधडक आणि अस्सल मराठमोळा ठरणार आहे.यंदाच्या सीझनची सर्वात मोठी खासियत म्हणजे घराची आगळीवेगळी संकल्पना आहे. नेक दारांनी सजलेलं हे भव्य घर केवळ राहण्यासाठी नसून, तेच या खेळाचं सर्वात मोठं शस्त्र ठरणार आहे. प्रत्येक दारामागे एखादं आव्हान, एखादा धक्का किंवा एखाद्याचं नशीब बदलणारा क्षण दडलेला असेल. “दार उघडणार… नशिबाचा गेम पालटणार!” ही केवळ टॅगलाईन नसून यंदाच्या सीझनचं मुख्य वैशिष्ट्य आहे.




