‘द कपिल शर्मा शो’ने टेलिव्हिजनवर प्रचंड लोकप्रियता मिळवली. या कॉमेडी शोमधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. त्यापैकीच एक पात्र म्हणजे रिंकू भाभी. कॉमेडियन सुनील ग्रोवरने ही भूमिका साकारली होती. कधी डॉक्टर गुलाटी तर कधी रिंकू भाभी बनून तो प्रेक्षकांना खळखळून हसवायचा. हाच सुनील गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर मका तर कधी दूध विकताना दिसून येतो. इतकंच काय तर सुनील रिक्षा चालवतानाही दिसला होता. सुनील हा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. (Sunil Grover Trolled)
अशातच अभिनेत्याने नुकताच एक त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामुळे तो टीकेचा धनी झाला आहे. खरंतर सुनील ग्रोव्हर नुकताच ऋषिकेशला भेटायला गेला होता. तेथे त्याने दर्शन घेतले. त्यानंतर गंगेत स्नान केले आणि सात्विक भोजनाचा आस्वादही घेतला. मग चालता चालता तो एके ठिकाणी थांबला, जिथे काही पादचारी आणि मजूर रस्त्यावर झोपले होते. सुनील ग्रोव्हरही त्याच्या शेजारी जाऊन जमिनीवर झोपला. याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि या व्हिडीओखाली त्याने ‘आणखी काय हवे’ असे लिहिले आहे.
सुनील ग्रोवरने शेअर केलेला हा व्हिडीओ जुना असून यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत आणि त्याच्या या कृतीला दिखावा असं म्हटलं आहे. “श्रीमंत लोकांना गरीब आहे ही दाखवण्यासाठी आपल्याबरोबर कॅमेराही घेऊन जावा लागतो”, “चांगला अभिनेता, चला आता व्हिडीओ तर बनला आहे, आता पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन झोपा”, “काय गरज आहे एवढा दिखावा करण्याची? जमिनीवर पडलेला मजूर आहे, तो थकवा दूर करण्यासाठी झोपला आहे आणि तुम्ही व्हिडीओ बनवण्यासाठी झोपला आहेत”. या आणि अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या व्हिडीओखाली आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, ऋषिकेशला गेल्यावर सुनील ग्रोव्हरने त्याची संपूर्ण दिनचर्या रेकॉर्ड केली आणि ती त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. सुनीलचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. अनेकांना हा सगळा एक दिखावा वाटत असून त्यांनी सुनीलवर निशाणा साधला आहे. मजुरांबरोबर झोपलेला असतानाही कॅमेरामनला घेऊन त्याचा व्हिडीओ कोण काढतं?, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.