मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय बहिणींची जोडी म्हणजे अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेत्री तितीक्षा तावडे. दोघींनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे दोघी नेहमीच चर्चेत असतात. दोघी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतात आणि या दोघी एकमेकींबरोबरचे खास फोटोही शेअर करत असतात. त्याच्या या फोटोला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत असतो. काही दिवसांपूर्वी २ ऑक्टोबरला खुशबू दुसऱ्यांदा आई झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर खुशबूने आपल्या लेकीबरोबचा खास फोटो शेअर केला असून लेकीचे नावही सांगितले आहे. (Tieeksha Tawde On Khushboo Daughter)
खुशबूने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पती संग्राम साळवी, मुलगा राघव आणि आपल्या गोंडस लेकीबरोबरचा खास फोटो शेअर केला आहे. खुशबूने आपल्या लाडक्या लेकीचे नाव ‘राधी’ असं ठेवलं आहे. त्यानंतर खुशबूची बहीण व अभिनेत्री तितीक्षा तावडेने खुशबूच्या मुलीच्या जन्मदिवसाचा खास व्हिडीओही शेअर केला. तितीक्षा युट्यूबवरील व्लॉगच्या माध्यमातून तिच्या आयुष्यातील काही खास क्षण आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. त्यामुळे तिने खुशबूच्या मुलीच्या जन्मदिवसाचा खास व्हिडीओही शेअर केला होता आणि यावेळी ती भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
आता तितीक्षाने मावशी झाल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मावशी ही आई असल्याची भावना तिने यावेळी व्यक्त केली. इट्स मज्जाशी साधलेल्या संवादात तितीक्षा असं म्हणाली की, “असं म्हणतात की मावशी ही आईच असते आणि खरंही आहे. कारण ती भावना आपण वेगळी करू शकत नाही की आईला असं वाटते आणि मावशीला असं वाटतं. मावशीलाही तेवढच प्रेम आणि तेवढीच ओढ असते. दुसरी गोष्ट म्हणजे मावशी कुठे तरी जास्त लाडावून ठेवते. म्हणजे भाच्याने काही मागितलं आणि ते मावशीने दिलं नाही असं कधी होणार नाही”.
यापुढे तितीक्षा असं म्हणाली की, “आई-बाबा मुलांच्या बाबतीत थोडी शिस्त पाळून असतात. की त्याला मागितलं म्हणून लगेच गोष्टी द्यायला नको. पण माझं असं नाही, जितक्या वेळेस तो काही मागेल तितक्या वेळेस त्याला द्यायचं. तर हाच एक फरक आहे. बाकी काही फरक नाही. बहिणीच्या मुलांच्या बाबतीत आईचीच एक भावना असते”. दरम्यान, पहिल्यांदाच भाचीचा फोटो पाहून तितीक्षाला प्रचंड आनंद झाल्याचं पाहायला मिळाला होता. मावशी झाल्यानिमित्त तितीक्षावर व आई झाल्यानिमित्त खुशबूवर सध्या चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव सुरु आहे.