स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या लोकप्रिय मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. या मालिकेत अभिनेत्री सावनी हे पात्र साकारत आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी अपूर्वा सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर आपल्या खाजगी आयुष्याबद्दलच्याही अनेक गोष्टी शेअर करते. अपूर्वा ‘बिग बॉस मराठी’ सीजन ४ मध्ये स्पर्धक म्हणून दिसलेली. या सीझनची ती उपविजेती ठरली. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यावरच काही महिन्यांनी तिच्या भावाचे दुःखद निधन झाले. त्यामुळे ती खूपच एकटी पडलेली. अनेकदा सोशल मीडियावर ती आपल्या भावाच्या आठवणी शेअर करायची. (Apurva Nemlekar Emotional Post)
तसंच ‘बिग बॉस’च्या घरात असताना अपूर्वाने वडील गेल्यानंतरच्या काही भावुक आठवणीसुद्धा शेअर केल्या होत्या. वडील व भावाच्या निधनामुळे अपूर्वाही पुरती कोलमडून गेल्याचे पाहायला मिळत आहे आणि भाऊ व वडिलांच्या आठवणीत ती अनेकदा भावुकही होते. याबद्दलच्या पोस्ट ती सोशल मीडियावर शेअर करत असते. याआधी अनेकदा तिने भाऊ व वडिलांच्या आठवणीत पोस्ट शेअर केल्या आहेत. अशातच आता तिने पुन्हा एकदा त्यांच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे. अपूर्वा नुकतीच भाऊ व वडिलांचे अस्थिविसर्जन केलेल्या ठिकाणी गेली होती. तिथले काही फोटो शेअर करत तिने एक पोस्ट लिहिली आहे.
या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “सर्वानाच माहीती आहे की जिथे जन्म आहे तिथे मृत्यू हा अटळ आहे… प्रत्येकाला एक ना एक दिवस या सुंदर जीवनाचा निरोप घ्यायचाच आहे. आणि या एकमेव मिळालेल्या जीवनाच्या प्रवासात आपल्याला लाभलेल्या आपल्या प्रिय व्यक्तींना कायमचा निरोप द्यायला. अलिप्तता (Detachment) हे कोणाला जमलं आहे? माझा हा केविलवाणा प्रयत्न सुरूच आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज पुन्हा त्याच वळणावर फिरून आले. श्री. क्षेत्र हरिहरेश्वर.. (कोकण दक्षिण काशी), ही तिच जागा जिथं मी माझ्या बाबांचं आणि भावाच अस्थिविसर्जन केलं होतं. ठिकाणीं त्या अथांग सागरावर पुन्हा एकदा उभ राहील्यावर थंड पाण्याचां स्पर्श जेव्हा झाला . तेंव्हा जणू अस वाटल की पप्पा आणि ओंकार ला घट्ट मिठी मारली आहे”.
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “या अथांग सागरकिनारी दाटुन आलेला ढगसुद्धा बरसला, त्याचबरोबरच दाटून आलेल्या मनाचासुद्धा डोळ्यातून बांध फुटला आणि मी मनसोक्त रडले. आयुष्याच्या प्रवासात वेगवेगळया भावना आपणं अनुभवतो, शिकतो, अंमलात आणतो. परंतू मनाचा अलिप्तपणा (Detachment) ही एकमेव असं भावना आहे की, ती कोणी शिकवत नाही. त्याचा शोध आपल्याला स्वतःच घ्यावा लागतो. असो, अलिप्तता जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असाच सुरु राहील. परंतू जेव्हा जमेल तेव्हा या दाटलेल्या ढगांना मनसोक्त बरसू द्यावं. म्हंणजे मन हलक होतं. मी, पप्पा आणि ओंकार पुन्हा भेटू नव्याने. लवकरच…”