‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नेटफ्लिक्सवर याचा पहिला भागही प्रदर्शित झाला. पहिल्या भागातच सलमान खानने हजेरी लावली होती. त्याचा एक वेगळाच अवतार, वेगळी बाजू प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली. अर्चना पुरण सिंह यांच्याबरोबरच नवज्योत सिंह सिद्धू यांची या शोमध्ये नव्याने ग्रँड एन्ट्री झाली. कपिलच्या शोचा पहिला भाग चांगलाच गाजला. इतर शोप्रमाणेच कपिलच्या शोमध्येही बॅकस्टेज बरीच धमाल असते. त्यातीलच एक क्षण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा क्षण म्हणजे अर्चना यांच्या घरी काम करणारी भाग्यश्री आणि सलमानची भेट. (archana puran singh salman khan)
अर्चना त्यांच्या घरात काम करणाऱ्या भाग्यश्रीबरोबरच नेहमीच व्लॉग करतात. गेली कित्येक वर्ष भाग्यश्री त्यांच्याकडे काम करत आहे. महत्त्वाचं म्हणजे अर्चना यांचे पती, मुलंही भाग्यश्रीला त्यांच्या कुटुंबाचा एक भाग समजतात. तशीच कौटुंबिक वागणूकही देतात. घर स्वच्छ ठेवणं, जेवण बनवणं अशी कित्येक कामं भाग्यश्री आनंदाने करते. अर्चना त्यांचं घर सांभाळण्याचं सगळं श्रेय भाग्यश्रीला देतात. म्हणूनच त्यांनी भाग्यश्रीला एक सरप्राइज दिलं.
लाखो चाहत्यांप्रमाणेच भाग्यश्रीही सलमानची चाहती आहे. वाढदिवसादिवशी सलमानला भेटण्याची इच्छा भाग्यश्रीने व्यक्त केली होती. मग काय अर्चना यांनी हेच मनावर घेतलं. भाग्यश्रीची इच्छा पूर्ण करण्याचं ठरवलं. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्येच अर्चना भाग्यश्रीला घेऊन गेल्या. यावेळी अर्चना यांची मुलं, पतीही होते. मात्र शोमध्ये सलमान येणार असल्याची कल्पनाही भाग्यश्रीला नव्हती. अर्चना यांनी वचन दिल्याप्रमाणे भाग्यश्रीची सलमानशी भेट घडवून दिली.
बॅकस्टेजला अर्चना यांनी त्यांच्या कुटुंबाची सलमानशी भेट घडवली. त्यानंतर भाग्यश्रीचीही ओळख करुन दिली. यावेळी सलमाननेही भाग्यश्रीचा हात मिळवला. यावेळी तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ती सलमानला I love you ही म्हणाली. सलमानही तिला प्रेमाने भेटला. भाग्यश्रीने अर्चना व तिच्या कुटुंबियांचे सेटवरच आभार मानले. घरात काम करणाऱ्या भाग्यश्रीला अर्चना देत असलेला सन्मान खरंच कौतुकास्पद आहे.





