Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ ही मालिका सुरु झाली तेव्हापासून चर्चेत आहे. या मालिकेच्या कथानकाने, तसेच कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळत आहे. या मालिकेतील सायली-अर्जुनच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. मालिकेत अमित भानुशाली अर्जुनही भूमिका साकारत आहे तर जुई गडकरी सायलीच्या भूमिकेत आहे. अमित व जुईला ‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली आहे. मालिकेत अर्जुनचा म्हणजेच अमितचा नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला. अमितच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन मालिकेत केलेलं पाहायला मिळालं.
सध्या ‘ठरलं तर मग’मधील अमितच्या वाढदिवसाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये अमितला वाढदिवसानिमित्त खास सरप्राइज मिळालेलं पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तो केक कापताना दिसत आहे. तर मालिकेचं संपूर्ण टीम अमितच्या वाढदिवसाला जमलेली दिसत आहे. सर्वच कलाकारांनी अमितला केक भरवत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. “आयुष्यात पहिल्यांदाच इतका मोठा वाढदिवस साजरा केला”, असं सांगत अभिनेत्याने यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मालिकेत सध्या अर्जुन व तन्वी यांच्या लग्नाची तयारी सुरु आहे. अर्जुनने पूर्णा आजीला वाचन दिल्यामुळे तो लग्नाला तयार होतो. मात्र सायलीला ठाम विश्वास असतो की, अर्जुनशी ती पुन्हा लग्न करणार. अर्जुन मात्र या सगळ्यात खूप नाराज असतो. आता सायली की तन्वी यापैकी अर्जुन नेमकं कोणाशी लग्न करणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. अशातच अर्जुनच्या म्हणजेच अमितच्या वाढदिवसाच्या व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. कारण मालिकेचं एक गुपित या व्हिडीओमध्ये उलगडलेलं पाहायला मिळत आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये गुलाबी रंगाचा ड्रेस, गळ्यात नेकलेस, हातात मॅचिंग बांगड्या असा प्रियाचा लग्नसराईसाठीचा लूक पाहायला मिळतोय. तर, सायलीने या व्हिडीओमध्ये निळ्या रंगाची साडी नेसल्याचं दिसतंय. यावरुन अर्जुन आणि सायलीने Twinning केलं आहे. त्यामुळे आता ऐनवेळी प्रियाला बाजूला करुन सायली आपल्याच नवऱ्याशी कसं लग्न करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.