Jui Gadkari Cooking Video : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळत आहे. या मालिकेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. मालिकेच्या कथानकाने आणि कलाकारांनी या मालिकेला एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे. या मालिकेतील सायली-अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. मालिकेत सायली ही भूमिका अभिनेत्री जुई गडकरी साकारत आहे. जुई ही मालिकाविश्वातील प्रेक्षकांची आवडती सून आहे. या मालिकेमुळेच जुईला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे. जुईपेक्षा तिला सायली या नावामुळे अधिक प्रसिद्धी मिळाली आहे.
जुई सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. चाहत्यांना सेटवरील आणि आयुष्यातील अनेक गोष्टी ती नेहमीच शेअर करत असते. जुईने सोशल मीडियावर आजवर शूटिंगच्या सेटवरील अनेक मजा-मस्तीचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. अशातच अभिनेत्रीने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये जुई स्वतःच्या हाताने सेटवर कुकीज बनवताना दिसत आहे.
मालिकेच्या एका सीनदरम्यान सायली अर्जुनसाठी बदामाच्या आकाराचे आणि लाल रंगाचे बिस्कीट बनवते, यांतून तिला प्रेम व्यक्त करायचं असतं, मात्र अर्जुन काही ती बिस्कीट पाहतच नाही. मालिकेच्या सीनसाठी लागणारी ही बिस्कीट सायलीने म्हणजेच जुईने स्वतःच्या हाताने बनवली आहेत. सेटवर कुकीज बनवतानाचा एक व्हिडीओ तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये कुकीज कसे बनवायचे हे अभिनेत्री सांगताना दिसत आहे.
हा व्हिडीओ शेअर करत जुईने म्हटलं की, “मला नेहमी स्वयंपाक करायला आवडतं आणि हो जेव्हा जेव्हा माझ्याकडे स्वयंपाकाचा सीन असतो तेव्हा मी ते नेहमी खऱ्या अर्थाने शिजवते. आणि यावेळी लाल कुकीजचा सीन होता. मी ही एक संधी कशी गमावली असती. हा बीटीएस व्हिडीओ चुकवू नका. तुम्ही सीनमध्ये पाहिलेल्या कुकीज प्रत्यक्षात मी बनवल्या होत्या, सगळ्यांनी याची छान चव घेतली”.