बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहूचर्चित चित्रपट ‘जोश’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला. यामध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री ऐश्वर्या रायदेखील दिसून आली होती. ऐश्वर्याने शाहरुखच्या बहिणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील एक अभिनेता हा आता चर्चेत आला आहे. हा अभिनेता म्हणजे शरद कपूर. इतक्या वर्षांनी त्याचे पुन्हा एकदा नाव समोर आले आहे. शरदच्या विरोधात आता एक गुन्हा दाखल झाला असून महिलेबरोबर दुर्व्यवहार केल्याचे समोर आले आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे आरोपदेखील लावण्यात आले आहेत. शरदविरोधात नक्की कोणते आरोप लावण्यात आले आहेत याबद्दल आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (sharad kapoor sexual harrasment fir)
मुंबई येथील खार पोलिस स्थानकात असलेल्या रिपोर्टनुसार, एका ३२ वर्षीय महिलेने शरदविरोधात तक्रार दाखल केली आहे. या घटणेबद्दल सांगताना पीडिता म्हणाली की, “शरद यांनी मला घरी बोलावलं होतं. यावेळी त्याने असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला आणि जबरदस्तीने चुकीच्या पद्धतिने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला”. पीडित महिलेने सांगितले की, “फेसबुकच्या माध्यामातून शरदशी संपर्क झाला होता. त्यानंतर व्हिडीओ कॉलवर संपर्क साधला”.
पुढे पीडितेने सांगितलं की, “शरदने चित्रीकरणाच्या निमित्ताने बोलायचे आहे असे सांगून भेटण्यास सांगितले. नंतर त्याने स्वतःचे लोकेशन शेअर केले आणि खार येथील ऑफिसमध्ये येण्यास सांगितले. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे ऑफिस नसून त्याचे घर असल्याचे समजले. मी जेव्हा त्याच्या घरी पोहोचले तेव्हा एका व्यक्तीने दरवाजा उघडला. त्यावेळी शरदने बेडरुममधून आवाज देत आत येण्यास सांगितले. त्यावेळी चुकीचा स्पर्शदेखील केला. नंतर त्याच संध्याकाळी शरदने पीडित महिलेला मेसेज पाठवला आणि चुकीच्या शब्दांचा वापर केला”.
ही सर्व घटना पीडितेने तिच्या मैत्रिणीला सांगितली. तिने जवळच्या पोलिस स्थानकात जाऊन अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली. या घटणेबद्दल अभिनेत्याने अद्याप कोणतेही वक्तव्य केले नाही. शरदच्या विरोधात भारतीय कलम ७४, कलम ७५ व कलम ७९ लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता अभिनेत्याविरोधात कोणती कारवाई केली जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.