‘स्टार प्रवाह’वरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. त्यामुळे टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर आहे. मालिकेत वेळोवेळी आलेली वळणं प्रेक्षकांना मालिकेशी जोडून ठेवतात. सायली ही भूमिका साकारणारी अभिनेत्री जूई गडकरी तर प्रेक्षकांच्या बरीच आवडीची आहे. तिचा मालिकेतील साधा, सोज्वळ स्वभाव प्रेक्षकांना खूपच भावतो. जुई सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती बऱ्याचदा सेटवरील मजामस्तीचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. नुकताच तिने सेटवरील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (jui gadkari share a video)
जुईने शेअर केलेला व्हिडिओत दुपारी २ ते ४ च्या दरम्यान सेटवर काय चालू असतं हे दिसत आहे. मालिकेतील कलाकार मंडळी एका बाजूला एकत्र मजामस्ती करत चित्रीकरण करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला जुई मोबाईलवर वेळ घालवताना दिसत आहे. पण काही काळानंतर ती मोबाईल चालूच ठेवून झोपून गेलेली दिसते.
या व्हिडिओला तिने कॅप्शन देत लिहिलं, ‘जेव्हा दुपारचे २ ते ४ वाजलेले असतात , सहकलाकार शूट करत असताता तेव्हा माझी आवडती गोष्ट!’ असं लिहीत तिने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरभरून लाईक व कमेंट केले आहेत. एका नेटकऱ्याने, ‘झोप महत्त्वाची’, असं लिहीत कमेंट केली आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने, ‘हे तर पुणेकरांच आवडतं काम’, असं लिहिलं आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या बरीच वळणं पाहायला मिळत आहेत. मालिकेत विसर्जनादरम्यान सायलीवर हल्ला झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे सध्या सायलीचे प्राण वाचवण्याची धडपड मालिकेत पाहायला मिळत आहे. सायलीला वाचवण्यासाठी ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगट आवश्यक आहे पण कोणाचाही रक्तगट तिच्याशी जुळत नाही. त्यामुळे आता या हल्ल्यामुळे मालिकेत काय वळण येतं व अर्जुन व सायलीच्या नात्याचं पुढे काय होतं हे पाहणं रंजक ठरणार आहे.