मराठीतील ‘बॉईज’च्या तिन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळाल्यानंतर आता ‘बॉईज ४’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट बराच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला. आता नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रकाशित असून त्याची बरीच चर्चा होत असल्याची पाहायला मिळत आहे. खूप मोठा स्टार कास्ट पाहायला मिळत असल्याने हा चित्रपट धमाकेदार असणार अशी अपेक्षा चाहते करत आहेत. (Boyz 4 trailer out)
विशाल देवरूखकर दिग्दर्शित ‘बॉईज ४’ चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरमध्ये बरेच बोल्ड संवाद, कॉमेडीची मेजवानी आणि खूप सारं मनोरंजन पाहायला मिळत आहे. चित्रपटात सगळी प्रसिद्ध युवा स्टारकास्ट मंडळी दिसत आहे. अभिनेता सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, अभिनेत्री रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, अभिनेता गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील ही मंडळी प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. त्याचे लूक सध्या बरेच चर्चेत आले आहेत. सगळ्यांचा लाडका गौरव मोरे आणि त्याचा हटके लूक प्रेक्षकांच्या बऱ्याच पसंत पडताना दिसत आहे.
‘बॉईज’, ‘बॉईज २’ आणि ‘बॉईज ३’ या तिन्ही चित्रपटातील धैर्या, ढुंग्या व कबीर या तिघांची मैत्री आपण सर्वांनी पाहिली. या तिघांच्या मैत्रीने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. पण ‘बॉईज ४’ चित्रपटात त्यांच्या मैत्रीत दरार आलेली दिसत आहे. त्यामुळे त्यांची मैत्री संपुष्टात आली आहे का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला. याचं उत्तर प्रेक्षकांना आता २० ऑक्टोबरला मिळणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अफलातून विनोदी भूमिका, कॉलेज कॅम्पस, तर लंडनमध्ये शूट या सगळ्याचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. प्रत्येक पात्र आपली भूमिका बरीच गाजवताना दिसत आहे. या चित्रपटातून हे सगळे अफलातून कलाकार त्यांच्या अभिनयातून चित्रपट गाजवायला सज्ज झाले आहेत. त्यामुळे चित्रपटगृहात हा चित्रपट धिंगाणा घालणार एवढं नक्की!
‘बॉईज ४’ चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी सांगितलं की, “या त्रिकुटांच्या मैत्रीची सुरुवात, चांगल्या-वाईट प्रसंगी त्यांनी एकमेकांना दिलेली साथ, थट्टामस्करी आपण यापूर्वीच्या तीन भागांमध्ये सर्वांनी अनुभवलं. मात्र आता यांच्या मैत्रीत ट्विस्ट दिसणार आहे. बॉईजच्या प्रत्येक भागाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. चित्रपटातील कलाकार जरी तेच असले तरी कथेत बरीच वळण पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात आता नव्या कलाकारांची एण्ट्री झाली आहे. अभिनय बेर्डे देखील या चित्रपटात हटके लूकमध्ये दिसणार आहे. ‘बॉईज ४’ चित्रपटाची कथा ही ‘बॉईज ३’ चित्रपटाची कथा होती. पण करोनातील परिस्थितीमुळे नवीन कथा लिहून ‘बॉईज ३’ चित्रपट चित्रित करण्यात आला. त्यासाठी दक्षिण भारत हे ठिकाण निश्चित करण्यात आलं”.
‘बॉईज ४’ चित्रपटाची निर्मिती अवधूत गुप्ते यांनी केली आहे. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया हे निर्माते आहेत. ह्रषिकेश कोळीने या चित्रपटाचे लेखन केले आहे. त्यामुळे आता हा चित्रपट किती धिंगाणा घालणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.