स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ मालिकेमधील अभिनेत्री मोनिका दबडे लवकरच आई होणार आहे. मोनिकाने ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर करून आपल्या चाहत्यांना दिली होती. मोनिकाने पोस्टमध्ये तिचा व छोटूशा शूजबरोबरचा फोटो शेअर करत आई होण्याच्या खुशखबरबद्दल सांगितलं होतं. या खास पोस्टद्वारे तिने एप्रिल २०२५ मध्ये बाळाचं स्वागत करणार असल्याचं होतं. त्यामुळे मोनिका आता खऱ्या आयुष्यात लवकरच आई होणार असून नुकतंच तिचं डोहाळे जेवण पार पडलं आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेतील कलाकारांनीच तिचं डोहाळे जेवण साजरे केले. (monika dabade emotional on baby shower)
मोनिकासाठी ‘ठरलं तर मग’ या मालिकेतील सर्व महिला कलाकारांनी डोहाळे जेवणाचे आयोजन केले होते. या खास डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी मोनिकाने हिरव्या-निळ्या रंगाची साडी परिधान केली होती, तर त्यावर गुलाबी फुलांचे दागिनेही घातले होते. अभिनेत्रीसाठी खास झोपाळा सजवण्यात आलेला, शिवाय तिने फुलांचा धनुष्यबाण घेऊन खास फोटोही काढले. हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या संपूर्ण सोहळ्याबद्दल तिने तिच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत आणि यावेळी अभिनेत्री काहीशी भावुकही झाली.
याबद्दल मोनिका असं म्हणाली की, “एक कल्पना होती की डोहाळे जेवण असतं. मी कधीच ठरवलं नव्हतं की, मला डोहाळे जेवण करायचं आहे आणि मी बारसं करणार किंवा काय. कारण यासाठी कुणीतरी लागतं. माझं लग्नही काही थाटात नव्हतं झालं. पण हे माझी आई कुठून तरी बघत आहे. लक्ष्मी आहे किंवा कुणी तरी देव आहे जो हे करत आहे असं मला वाटतं. त्यामुळे कदाचित हे सर्व तुम्हाला सुचलं. तुम्ही सगळं ते मनापासून केलं. माझ्या मते हे इंडस्ट्रीत कुणी कधी केलं आहे असं वाटतं नाही. म्हणजे मी असं कुठे कधी बघितलंच नाही”
यापुढे मोनिकाने असं म्हटलं की, “आपली मालिका का पहिल्या नंबरवर आहे. तर त्याचं हेच कारण आहे की आपण सगळ्याजणी एकमेकींसाठी आहोत. लोकांना हे खोटं वाटू शकतं किंवा काहीही असेल. पण हे आहे, त्यामुळेच आपण आहोत आणि त्यामुळेच माझ्याबाबतीत हे घडत आहे असं मला वाटतं. मी स्वत:ला खूपच भाग्यवान समजते आणि इथल्या प्रत्येकाच्या आयुष्यात हे असं छान छान व्हावं हीच माझी इच्छा आहे. पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप धन्यवाद”.