स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ या मालिकेमध्ये अस्मिता हे पात्र साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडे लवकरच आई होणार आहे. मोनिकाने ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर करून आपल्या चाहत्यांना दिली होती. मोनिकाने पोस्टमध्ये तिचा व छोटूशा शूजबरोबरचा फोटो शेअर करत आई होण्याच्या खुशखबरबद्दल सांगितलं होतं. या खास पोस्टद्वारे तिने एप्रिल २०२५ मध्ये बाळाचं स्वागत करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे मोनिका आता खऱ्या आयुष्यात लवकरच आई होणार असून नुकतंच तिचं डोहाळे जेवण पार पडलं आहे. अभिनेत्री सध्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेत अस्मिताची भूमिका साकारत आहे. त्यामुळे मालिकेतील कलाकारांनीच तिचं डोहाळे जेवण साजरे केले.
या खास कार्यक्रमासाठी ‘ठरलं तर मग’मधील सर्व महिला कलाकार उपस्थित होत्या, मोनिकासाठी त्यांनी खास डान्सही केला. सेटवरील या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी मोनिकाने हिरव्या-निळ्या रंगाची साडी परिधान केली होती, तर त्यावर गुलाबी फुलांचे दागिनेही घातले होते. अभिनेत्रीसाठी खास झोपाळा सजवण्यात आलेला, शिवाय तिने फुलांचा धनुष्यबाण घेऊन खास फोटोही काढले. हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि या सर्व कलाकारांबद्दल व डोहाळे जेवणाच्या सेलिब्रेशनसाठी तिने सर्वांचे आभारही मानले आहेत.
आणखी वाचा – 14 January Horoscope : मकर संक्रांतीच्या दिवशी ‘या’ राशींचे नशीब चमकणार, जाणून घ्या
मोनिकाने डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो शेअर करत असं म्हटलं आहे की, “माझं डोहाळे जेवण. ज्या क्षेत्रात आपण काम करतो, तिथल्या मैत्रीणींकडून जेव्हा असं कौतुक होतं, तेव्हा मला खरंच वाटतं की, भाग्यवान आहे. माझ्या आईनी जेवढ्या आवडीने माझं डोहाळे जेवण केलं असतं, त्याच्या दुप्पट उत्साहाने या माझ्या मैत्रिणींनी माझं सगळं केलं. सूचित्रा बांदेकर माझ्या सासू झाल्या तर प्राजक्ता दिघे माझ्या आई झाल्या. बाकी प्राजक्ता तेंडोलकर, जुई गडकरी, प्राजक्ता विलास, संजना पाटील, दिशा दांडे माझ्या बहिणी झाल्या आणि ज्योती चांदेकर माझ्या आजी झाल्या”.
आणखी वाचा – Video : अक्षया-हार्दिक पोहोचले देवदर्शनाला, स्वतःच्या खांद्यावरुन वाहिली पालखी, व्हिडीओ व्हायरल
यापुढे तिने आणखी काहींचा उल्लेख करत मला माझं पूर्ण कुटुंब मिळालं असल्याची भावना व्यक्त केली आहे. शिवाय यापुढे तिने असं म्हटलं की, “खुप दिवस या सगळ्या मिळून हे प्लॅन करत होत्या आणि मला हे गोड सरप्राइज दिलं. यासाठी शूटिंगला सुट्टी देऊन हा असा सोहळा माझ्यासाठी करणं ही माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट आहे. मी आणि चिन्मय आयुष्यभर हे लक्षात ठेऊच पण माझ्या बाळाला हे नक्की सांगु की, या सगळ्यांचे आशिर्वाद आणि प्रेम नेहमी तुझ्या पाठीशी आहेत”.