Amit Bhanushali Son : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिका गेली अडीच वर्षे प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता अमित भानुशाली व अभिनेत्री जुई गडकरी मुख्य भूमिका साकारत आहेत. अमित-जुई या मालिकेत अर्जुन व सायली या भूमिका साकारत आहेत. तसेच या दोघांच्या ही भूमिकेला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळत आहे. आपल्या आवडत्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडतं. आणि हे कलाकार नेहमीच त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल किंवा व्यायवसायिक आयुष्याबद्दल सोशल मीडियावर अपडेट्स शेअर करत असतात.
प्रेक्षकांचा लाडका अर्जुन म्हणजेच अमित भानुशाली देखील सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. कधी सेटवरचे तर कधी कौटुंबिक रील्स व्हिडीओ अभिनेता त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. अशातच अमित व त्याच्या पत्नीने नुकताच त्यांचा मुलगा हृधानचा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अमित भानुशालीच्या पत्नीचं नाव श्रद्धा असून, तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हृधान “सारेगमप…” गाताना दिसत आहे.
अमितच्या लेकाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही पोस्ट शेअर करत अमितच्या पत्नीने लिहिलं आहे की, “Back when he knew Sa Re Ga Ma before ABC!” No language, no problem — just full-on sur mode”. या शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेकजण हृधानवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. चाहत्यांसह अनेक कलाकार मंडळींनीही या व्हिडीओला पसंती दर्शविली आहे.
अमित आणि श्रद्धा हे मूळचे डोंबिवलीतील आहेत. डोंबिवली रेल्वे स्थानकातच त्यांची भेट झाली. दोघांतील कोणीही एकमेकांना प्रपोज केले नाही. शेवटी भेटीच्या १५ दिवसांनंतर अमितने श्रद्धाला थेट लग्नाची मागणी घातली. अगदी रस्त्यावरुन चालताना त्याने श्रद्धाला लग्नाची मागणी घातली. अमित व श्रद्धा यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे हे त्यांच्या पोस्टमधून नेहमीच पाहायला मिळतं.





