Tharal Tar Mag serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळत आहे की, एकीकडे अर्जुनला मधु भाऊंची सुटका झाली तर सायली आपल्याला सोडून जाईल अशी भीती वाटत असते. तसेच स्वप्न त्याला पडल्याने तो तशी भीती घेऊन वावरत असतो. आणि या भीतीपोटीच तो सायलीची विशेष काळजी घेतानाही दिसतो. त्याच वेळेला सगळेजण नाश्ता करत असताना सायली खाली येते आणि सांगते की, ‘मी बाजारात भाज्या आणायला चालले आहे’. तेव्हा अर्जुनचा जीववर खाली होतो. सायली आपल्याला कायमची सोडून तर चालली नाहीये ना या भीतीने तो सायलीला अनेक प्रश्न विचारतो.
मात्र सायली भाजी घ्यायला घरातून निघून जाते. त्यानंतर अर्जुन कामावर जातो तरी अर्जुनचं काही कामात लक्ष लागत नाही. तो सतत सायलीला फोन करत असतो तेव्हा सायली अर्जुनला ओरडते की, ‘तुम्ही मला भाजी घ्यायला देणार आहात का?, सारखे सारखे मला फोन करताय मला भाजी सुद्धा घेऊ देत नाहीये आणि सारखं आपलं एकच घरी पोहोचलात का?. मी घरी गेल्यावर तुम्हाला फोन करुन सांगेन’, असं म्हणत फोन ठेवते. तर इकडे जजला लाच दिलेलं प्रकरण सर्वांसमोर आलेलं असतं त्यामुळे त्या भागातील आमदारही महिपतला यापुढे मदत करणार नसल्याचे स्पष्टपणे सांगतात. त्यामुळे महिपतची आता चिडचिड झालेली असते.
अर्जुनला धडा कसा शिकवायचा यासाठी आता तो विशेष लक्ष देताना दिसतोय. त्यानंतर इकडे अर्जुन व चैतन्य केसबद्दल चर्चा करुन झाल्यावर जेवायला घेतात. त्याच वेळेला चैतन्याच्या एका कृतीवरुन अर्जुनला मधु भाऊंची सुटका कशी होईल याचा पुरावा मिळतो. मधुभाऊंच्या उजव्या हातात जोर नाहीये त्यामुळे ते बंदूक उचलू शकत नाहीत हे अर्जुनच्या लक्षात येतं आणि पोलीस रिपोर्ट नुसार विलासचा झालेला हा खून उजव्या हाताने मारलेल्या बंदुकीच्या गोळीतून झाल्याचं समोर आलेलं असतं. शिवाय विलास खुनाच्या वेळेत व पोलिसांना केलेल्या मॅसेजच्या या दोन्ही वेळा मिस मॅच असल्याचेही समोर येते. त्यामुळे ही केस सुटायला उपयोग होणार असल्याचे समोर येतं. तर पोलीस रिपोर्टनुसार मधु भाऊंची एका वर्षातील जेलमधील वागणूक ही अत्यंत योग्य असल्याचं समोर येत त्यामुळे मधु भाऊंना बेल मिळणे शक्य होणार असल्याचे अर्जुन सांगतो. अर्जुन घरी आल्यानंतर सायली व अर्जुन बोलत असतात तेव्हा सायली सांगते की, ‘मधु भाऊंची सुटका झाली की आपण आश्रम पुन्हा सुरु करु. माझ्यासारख्या आई वडील नसलेल्यांना एक आश्रय मिळेल याची मला खूपच उत्सुकता लागून राहिली आहे.
आणखी वाचा – नातं जपलं! सूरज चव्हाणच्या गावी पोहोचली जान्हवी किल्लेकर, फोटो शेअर करत म्हणाला, “लाडकी ताई…”
सायली आपल्या मनातील भावना व्यक्त करते तेव्हा सायली अर्जुन पुढे असेही म्हणते की, ‘आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल जेव्हा घरात कळेल तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसेल. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे कळल्यावर काय होईल या भीतीने अर्जुनही शांतच होतो. ‘मी विचार करुन सांगतो’, असं तो सांगतो. त्यानंतर सायली अर्जुनला विचारते, ‘पण मी इथून निघून गेल्यानंतर तुम्ही काय करणार?, तुमचं सुद्धा प्रिया बरोबर लग्न लावूनच देतील’. यावर अर्जुन काहीच बोलत नाही. आता सायलीला मिळवण्यासाठी अर्जुन मधु भाऊंची सुटका करण्यापासून थांबवणार का?, हे सारं पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.