‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. मालिकेत येणाऱ्या रंजक ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेत सध्या कल्पनाच्या गैरसमजापोटी सायली व अर्जुन आई-बाबा होणार असल्याची स्वप्न रंगवताना दिसत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनाही सायली व अर्जुन खरंच आई-बाबा होणार का याची उत्सुकता लागून राहिली आहे. तर एकीकडे प्रिया म्हणजेच तन्वीची नवी चालही मालिकेत पहायला मिळत आहे. (Tharal Tar Mag Promo)
रविराज किल्लेदार सध्या प्रतिमाचा शोध घेण्यात व्यस्त असतात. तर ही गोष्ट प्रियाला खटकते. प्रतिमाचा एकदाचा सोक्षमोक्ष लावावा म्हणून प्रिया नागराजला हाताशी घेऊन खेळी खेळते. शवागारात काम करणाऱ्या कामगाराला पैसे देऊन ते प्रतिमासारखीच एका महिलेची बॉडी घेतात आणि त्यावर प्रतिमाशी मिळत्याजुळत्या खुणा करतात. ज्यामुळे ती प्रतिमा असल्याचं सिद्ध होईल. अगदी प्रिया व नागराजच्या प्लॅनप्रमाणे सर्वकाही सुरळीत होत असतं.
मालिकेत असं पाहायला मिळालं की, प्रियाच इन्स्पेक्टरला त्या बॉडीबाबत माहिती देते. त्यानंतर इन्स्पेक्टर रविराजला कॉल करुन प्रतिमाची डेड बॉडी सापडली असल्याचं सांगतात. हे ऐकून रविराज खूप घाबरतो. तर तन्वीही खोटं रडण्याचे नाटक करते. अशातच मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. यांत रविराज प्रतिमाच्या फोटोला हार घालायला जाताना दिसत आहे. तर प्रतिमाच्या कार्याला किल्लेदारांकडे सुभेदार कुटुंबही आलेलं असतं.
मालिकेच्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये पूर्णा आजी सायलीला पाहून म्हणते की, “प्रतिमा. माझी प्रतिमा”. असं म्हणत पूर्णा आजी सायलीला जवळ करत तिचे लाड करतात. त्यावर तन्वी सायलीजवळ जाते आणि म्हणते की, “तू आताच्या आता माझ्या आईची साडी बदल नाहीतर…”, यावर पूर्णा आजी तन्वीला थांबवतात आणि सगळ्यांसमोर बोलतात की, “हिच्या रुपात मला माझी प्रतिमा जिवंत असल्याचा भास होतोय. त्या फोटोला हार नको घालूया”, असं म्हणतात. यावर रविराज फोटोला हार घालायला जाणार इतक्यात थांबतात. आता प्रतिमाचा भास म्हणून तरी पूर्णा आजी सायलीचा नातसून म्हणून स्वीकार करणार का?, तसेच प्रतिमा व रविराज यांची खरी मुलगी सायली असल्याचं सत्य समोर येणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.