‘ठरलं तर मग’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेला प्रेक्षकवर्ग भरभरुन प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत आलेल्या रंजक वळणांमुळे ही मालिका अल्पावधीतीच प्रेक्षकांची आवडती मालिका झाली. मालिकेत सध्या सायली व अर्जुनच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. सायली व अर्जुन एकमेकांच्या प्रेमात असलेले सध्या मालिकेत पाहायला मिळत आहे. मात्र दोघांनी अद्याप याबाबत एकमेकांना कबुली दिलेली नाही. सध्या मालिकेत नुकताच गुढीपाडवा विशेष भाग साजरा झाल्याचं पाहायला मिळालं. (Tharal Tar Mag New Promo)
गुढीपाडवा विशेष भागात मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री झालेली पाहायला मिळाली. मालिकेत अर्जुनची जुनी मैत्रीण आलेली पाहायला मिळत आहे. परदेशातून ती तिच्या केसच्या कामानिमित्त भारतात परतली आहे. मानसीची केस आता अर्जुन लढणार आहे. म्हणून ती अर्जुनला भेटायला येते. अर्जुनला भेटताच दोघेही घट्ट मिठी मारतात. त्यामुळे अर्जुनची जुनी मैत्रीण घरी परतल्यानंतर आता अर्जुन-सायलीच्या नात्यावर याचा काही परिणाम होणार का?, याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत. दरम्यान, मानसी व अर्जुनची गळाभेट सायलीलाही खटकलेली असते.
मानसीचा सुभेदारांच्या घरातील मनमोकळेपणाने असलेला वावर पाहून सायली आश्चर्यचकित होते. मानसी अर्जुनसह सुभेदारांच्या फारच जवळची आहे असा विचार करत सायलीचा जळफळाट होतो. शेवटी सायली काहीतरी करुन अर्जुनला इम्प्रेस करण्यासाठी युक्ती लढवते. मानसीने निळ्या रंगाच्या शॉर्ट वनपीसमध्ये एंट्री घेतलेली असते. सायलीशी भेट झाल्यानंतर अर्जुन व मानसी बोलत असतात. तेव्हा मानसी अर्जुनला विचारते की तू एवढ्या सध्या मुलीशी का लग्न केलं?, सायली अर्जुन व मानसीच बोलणं ऐकते. त्यानंतर ती अर्जुनला एम्प्रेस करायचं ठरवते.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सायली स्वतःच्या लूकमध्ये बदल करताना दिसते. मानसीप्रमाणे तीदेखील शॉर्ट काळ्या रंगाचा वनपीस, त्यावर उंच चपला असा वेस्टर्न लूक करते. सायलीला या नव्या लूकमध्ये पाहून अर्जुनला हसू आवरत नाही.अर्जुनला हसताना पाहून सायलीच्या डोळ्यात पाणी येतं. त्यांनतर सायली तिथून निघून जाते तेव्हा अर्जुन सायलीचा हात धरून तिला थांबवतो आणि ‘मिसेस सायली तुम्ही आहात तशाच खूप सुंदर आहात, तुम्ही इतक्या गोड आहात की कुणीही तुमच्या प्रेमात पडेल’, असं म्हणतो. यावर सायली अर्जुनला ‘आणि तुम्ही?’, असा प्रश्न करते. आता मालिकेच्या आगामी भागात अर्जुन सायलीसमोर प्रेमाची कबुली देणार का?, की मानसीच्या येण्याने अर्जुन-सायलीच्या नात्यात फूट पडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.