‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असून या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. आजवर या मालिकेच्या हटके कथानकाने प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवलं आहे. सायली ही भूमिका मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी साकारताना दिसत आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली या पात्रामुळे जुईला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. याशिवाय याआधीही जुईने अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका करत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. (Jui Gadkari On Wedding)
जुईने प्रेक्षकांच्या मनात घर केलं असलं तरी जुई लग्न कधी करणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळून राहिल्या आहेत. बरेचदा जुईला लग्न कधी करणार असा सवालही करण्यात आला आहे. यावर आता जुईने भाष्य केलं आहे. जुईने नुकतीच सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना तिने असं उत्तर दिलं की, “माझ्या घरी माझे आई-बाबा आणि मी राहते. आमचं एकत्र कुटुंब आहे. कर्जतमध्ये आधी आमचा खूप मोठा वाडा होता पण आता बिल्डिंग असून आम्ही सर्व एकत्र त्या बिल्डिंगमध्ये राहतो. मला खूप काकी, काका आहेत त्यामुळे मला एकत्र कुटुंबात राहायची सवय आहे”.
पुढे ती म्हणाली, “मला पण असंच माझं स्वतःचं मोठं कुटुंब हवं आहे, मी अजून तरी मला हव्या असणाऱ्या या कुटुंबाबाबत विचार केला नाही आहे. सध्या जोरात काम सुरु आहे. पण अर्थात मलाही माझं कुटुंब हवं आहे. आता माझं खूप झालं. माझ्या मैत्रिणींची मुलं १०-१० वर्षांची आहेत त्यामुळे आता मलाही विचार करावा लागणार. मी नेहमीच असं म्हणते की, देवाने माझ्यासाठी खूप चांगले मार्ग ठेवले आहेत. इतका उशीर होत आहे म्हणजे अर्थात सगळं चांगलंच असेल”.
पुढे ती असंही म्हणाली की, “मी त्याची वाट पाहत आहे. मला माझ्यासारखा साधा, सरळ, सोप्पा नवरा हवा आहे. पूर्णतः शाकाहारीही असावा. आणि कुटुंबात रमला पाहिजे असा असावा. आणि मुख्य म्हणजे मी ज्या क्षेत्रात काम करत आहे त्या क्षेत्राला तो समजून घेणारा हवा. आमच्या कुटुंबातील सर्व माणसं खूप लोभी आहेत, आणि तो जेव्हा आमच्या कुटुंबाचा भाग होईल तेव्हा नक्कीच ते त्याचे लाड करतील. हे सर्व सांभाळून त्याने मला सांभाळावं एवढीच इच्छा आहे”.