‘बिग बॉस’ मराठीच्या नवीन पर्वाला सुरुवात भांडणांनी झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्या दिवसापासून् निक्की तांबोळी व वर्षा उसगांवकर यांच्यात भांडण झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच कालच्या भागात निक्कीने वर्षा ताईंबरोबर भांडण करताना आपली पातळी सोडली. घरातील सर्व सदस्य लिव्हिंग परिसरात बसले असताना ‘बिग बॉस’ जे जे घरातील बेडवर बसले होते त्यांच्यामुळे इतर सदस्यांना शिक्षा सूनावतात. बेडवर बसलेले सदस्य हे अरबाज, अभिजीत व वर्षा उसगांवकर असतात. त्यांनी नियम भंग केल्यामुळे ‘बिग बॉस’ घरातील सदस्यांना शिक्षा सुनावतात. बेड संबंधित नियम उल्लंघन केल्यामुळे संपूर्ण आठवडा बेडशिवाय सदस्यांना झोपण्याची शिक्षा बिग बॉसने दिली. यावेळी निक्कीचा पार चढला आणि तिने वर्षा उसगांवकरांमुळेच ही शिक्षा घरातील सदस्यांना झाल्याचा आरोप केला.
निक्कीने वर्षाताईंबरोबर केलेल्या या भांडणावर चाहत्यांसह अनेक कलाकार मंडळीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अशातच गंगा म्हणजेच अभिनेत्री प्रणित हाटेने सोशल मीडियावर वर्षाताईंबद्दलची एक संतप्त पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये प्रणित असं म्हणाली की, “‘बिग बॉस मराठी’च्या भागात निक्की तांबोळी ज्या पद्धतीने वर्षा उसगांवकर यांच्याशी बोलत आहे, ते अत्यंत भयानक आहे. ती निक्की जी कोणीही असेल. पण आपल्या ज्येष्ठ कलाकारांशी कसं वागावं, बोलावं याची एक समज असते. सोफ्यावर त्या एकट्याच बसल्या होत्या असं नाही. इतर स्पर्धकदेखील बसले होते. गार्डनच्या परिसरात काही स्पर्धक बेडवरही बसले होते”.
आणखी वाचा – खाण्यावरुनही निक्की तांबोळीने वर्षा उसगांवकरांना टोकलं, जोरजोरात ओरडू लागली अन्…; इतर सदस्य गप्प का?
यापुढे प्रणित असं म्हणाली की, “वर्षा तंगड्या वर करुन झोपते. हे किती विचित्र वाक्य आणि किती अपमान करणारं वाक्य आहे. त्यामुळे आता यावर रितेश देशमुख यांची काय प्रतिक्रिया असणार? हे बघायचं आहे. कारण घरात ज्येष्ठ कलाकारांना असं रडताना आणि अपमानित होताना बघून खूपच वाईट वाटतं. त्यामुळे कोणीतरी निक्कीला बोललं पाहिजे होतं. तिथले सगळे तोंड बंद करुन बसले होते. पण एकामध्येही हिंमत झाली नाही पुढे येऊन निक्कीला “तू चुकीची आहेस” हे बोलण्याची हिंमत झाली नाही. त्यामुळे आता हे सगळं रितेश देशमुखच्या हातात आहे. त्याची यावर काय प्रतिक्रिया असणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे.”
या व्हिडीओसह प्रणितने “निक्की तांबोळी ज्याप्रकारे वर्षा उसगांवकर मॅडमशी वागत आहे, हे अत्यंत लज्जास्पद आहे. आपल्या ज्येष्ठ कलाकारांशी कसं बोलावं हे समजून घेणं तिनं गरजेचं आहे. त्यामुळे रितेश देशमुखने योग्य भूमिका घेऊन वर्षा उसगांवकरांच्या पाठिशी उभं राहायला पाहिजे” असं कॅप्शनही दिलं आहे. त्यामुळे आता आगामी भागांत रितेश कुणाची कशी शाळा घेणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.