कलाकार मंडळी त्यांच्या अभिनयायने प्रेक्षकांना आपलंस करून घेतात. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी कलाकार मालिका, चित्रपट, नाटक, वेबसीरिज या माध्यमातून वेगवेगळ्या भूमिका साकारत असतात. कलाकारांसाठी एखादं काम मिळवणं किंवा टिकवणं ही सोपी बाब नाही. तरीही कलाकार मंडळी तग धरून उभी राहतात. अनेकदा कलाकारांकडे काम नसतं अशावेळी कलाकार धीराने त्या परिस्थितीला सामोरं जातात. पण कितीही झालं तरी एक पाऊल मागे घेण्याचा विचार येतोच. अभिनेत्री मोनिका दबडे बाबतीतही असंच काहीसं झालं होतं.(Monika Dabade told her stuggle period)
स्टार प्रवाह वरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका नंबर वन ठरली आहे. ‘ठरलं तर मग’मध्ये जुई गडकरी आणि अमित भानुशाली मुख्य भूमिकेत आहेत. दरम्यान मालिकेतील सायली-अर्जुन या पात्रांवर प्रेक्षकांनी विशेष प्रेम केलंच आहे. मात्र यामध्ये असणाऱ्या नकारात्मक पात्रांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली. यामध्ये असेच एक नकारात्मक बाजू असणारे पात्र म्हणजे ‘अस्मिता’. मालिकेत अस्मिताची भूमिका मराठी अभिनेत्री मोनिका साकारत आहे. प्रियाच्या मदतीने ती सायली विरोधात जी कारस्थानं रचते यावरुन नक्कीच प्रेक्षक तिचा तिरस्कार करतात. दरम्यान मोनिका सध्या या मालिकेमुळे घराघरात पोहोचली असली तरी इथपर्यंतचा तिचा प्रवास सोपा नव्हता.
कोविड काळानंतर अभिनेत्रीला सिनेसृष्टीत टिकून राहण्यासाठी कठीण काळाचा सामना करावा लागला. मध्यंतरी ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या स्ट्रगलविषयी भाष्य केले. तिचा प्रवास, संघर्ष आणि कोविड-१९ नंतर टेलिव्हिजन विश्वात भूमिका मिळवणे तिच्यासाठी कसं कठीण गेलं याविषयी मनमोकळेपणाने सांगितलं. मोनिकाने तिच्या अभिनयातील आवडीबद्दल बोलताना असे म्हटले की, “मी २०११ पासून विविध नाटकांमध्ये काम करते आहे. कॉलेजमध्ये विविध भूमिकांसाठी मी अनेक पारितोषिके आणि पुरस्कारही जिंकले आहेत. मी आधीच ठरवले होते की मी अभिनय क्षेत्रात करिअर करायचं आहे”.
मोनिका पुढे म्हणाली की, “करोनानंतर माझ्याकडे कोणतेही काम नव्हते. माझ्याकडे पैसेही उरले नव्हते. मी माझ्या गावी पुण्याला परत जाण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर मला वाटले की मी अधिक चिकाटी ठेवायला हवी. मी थांबायचे ठरवले आणि मला ‘आई मायेचं कवच’ आणि आता ‘ठरलं तर मग’ या मालिका मिळाल्या. मला अभिमान आहे की मी माझ्या आयुष्यात आव्हानांचा सामना केला आणि माझ्या पालकांकडून पैसे मागितले नाहीत”. मोनिकाचा हा संपूर्ण प्रवास खरंच कौतुकास्पद आहे.