गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपटांना चांगले दिवस येत असून त्यातील बरेचसे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करताना दिसत आहे. मात्र यावर्षी प्रदर्शित झालेले वेड, वाळवी, महाराष्ट्र शाहीर, बाईपण भारी देवा आणि नुकतंच प्रदर्शित झालेला अफलातून या चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद तर मिळालाच. शिवाय या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली आहे. (thakabai movie)
मराठी चित्रपटसृष्टीत बऱ्याच वर्षांपासून विविध मुद्द्यांवर अनेक सिनेमा येतात. त्यात बरेचसे चित्रपट हे सामाजिक मुद्द्यांवर आधारित असतात. पण गेल्या काही वर्षांपासून अनेक रहस्यमयी आणि गूढ मराठी चित्रपट येत असून त्या सर्व चित्रपटांना प्रेक्षक नेहमीच पसंती दर्शवत असतात. अश्या धाटणीचे चित्रपट पाहण्यास प्रेक्षक आतुरलेले असताना आणखी एक रहस्यमयी आणि गूढ मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो सिनेमा म्हणजे ‘थकाबाई’.
नवोदित दिग्दर्शक युवीन कापसे हा रहस्यमयी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘थकाबाई’ असं या चित्रपटाचं नाव असून या नावातच चित्रपटाचं रहस्य दडलेलं आहे. या चित्रपटात शुभंकर तावडे आणि हेमल इंगळे मुख्य भूमिकेत दिसणार असून चित्रपटाचे पोस्टर लॉन्च नुकतेच बांद्राच्या ‘शॉ किया’ शोरूममध्ये पार पडले.
‘थकाबाई’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च (thakabai movie poster launch)
‘थकाबाई’ चित्रपटाचे पोस्टर त्याच्या विषयासारखेच रहस्यमयी आहे. पोस्टरवर शुभंकर तावडेचा एक भयावह लूक त्याच्या उग्र हावभावांसह दिसतोय. तर हेमल इंगळे या रहस्याचा शोध घेणाऱ्या मुलीच्या भूमिकेत दिसत आहे. हेमलच्या हातात कंदिल असून ती जंगलात काहीतरी शोधतेय अशी मुद्रा तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. ‘सत्य की असत्य, थकाबाई: जाणे रहस्य’ या नावामुळे चित्रपटात नेमकं काय असेल, थकाबाई म्हणजे नक्की कोण? आणि तिचं काय रहस्य आहे, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
सुनील जैन प्रस्तुत आणि दीवा सिंह, युवीन कापसे निर्मित ‘थकाबाई’ चित्रपटाच्या पोस्टर लॉन्चप्रसंगी अजय गेही, दानिश अल्फाज, जयकुमार नायर, आमीर सिकंदर, मुदसिर भट, प्रतिक्षा मिश्रा, उमेश घळसासी, मकरंद उपाध्याय, नामदेव कापसे आदी मान्यवर उपस्थित होते. (thakabai movie poster launch)