टेलिव्हीजनवरील लोकप्रिय मालिका ‘शक्तिमान’ ही मालिका ही पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारणारे मुकेश खन्ना हे देखील अधिक चर्चेत असलेले बघायला मिळत आहेत. हा शो पुन्हा एकदा नव्या रुपात येणार असल्याची घोषणा स्वतः मुकेश यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. मात्र यामध्ये शक्तिमानच्या भूमिकेत नक्की कोण दिसणार याबद्दल मोठा प्रश्न उपस्थित राहिला आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी शक्तिमान हा चित्रपट स्वरुपातदेखील येणार असल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिका साकारणार असे समजले होते. मात्र मुकेश यांनी रणवीरच्या भूमिकेला विरोध दर्शवला होता. रणवीरच्या निवडीबाबत त्यांनी अनेकदा भाष्यदेखील केले आहे. (mukesh khanna on pushpa 2)
मुकेश हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. नुकताच त्यांनी अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २ : द रुल’ या चित्रपटाचा रिव्ह्यू केला. त्यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलच्या माध्यामातून या चित्रपटाबद्दलचे त्यांचे मत व्यक्त केले आहे. दिग्दर्शक सुकुमार यांच्या चित्रपटाचे खूप कौतुक केले आहे. त्यांनी मत मांडताना सांगितले की, “एक चित्रपट फक्त पैशांनी बनत नाही. त्यासाठी नियोजनाची गरज असते. ‘पुष्पा’ या चित्रपटासाठी खर्च केलेला एक एक पैसा स्क्रीनवर दिसून येत आहे. प्रत्येक सीनमुळे मी प्रभावित झालो आहे. मनमोहन देसाई यांनी ‘अमर अकबर अँथनी’ या चित्रपटाच्या वेळी ही भावना आली होती. या चित्रपटामध्ये सुकुमारने देखील असंच काहीसं केलं आहे”.
मुकेश यांनी अल्लू अर्जुनला १० मधील आठ-नऊ नंबर दिले आहेत. तसेच त्यांनी अल्लू अर्जुन शक्तिमानची भूमिका योग्य प्रकारे साकारु शकतो असे मुकेश म्हणाले. तसेच त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटातील सांस्कृतिक व धार्मिक भावना सन्मान करण्याची तुलना केली आहे. त्यांनी सांगितले की, “दक्षिणेतील चित्रपटनिर्माते धर्माचा सन्मान करतात. जेव्हा बॉलिवूडमधील लोक वाद करुन लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात”.
दरम्यान मुकेश यांनी ‘पुष्पा २’ चित्रपटातील तस्करीबद्दल भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “तस्करी श्रेष्ठ असून पोलिसांचे महत्त्व कमी केले आहे? हे दाखवून समाजाला काय सिद्ध करायचे आहे?” त्यांनी निर्मात्यांना योग्य संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याची मागणी केली आहे. तसेच लेखकांना योग्य पगार द्यावा अशी मागणीदेखील केली.