टेलिव्हिजनवरील लाडकी अभिनेत्री म्हणून अंकिता लोखंडेचे नाव घेतले जाते. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमधून अंकिता घराघरात पोहोचली. तिच्या अभिनयाने सर्वांनाच भुरळ घातली. या मालिकेमध्ये तिने ‘अर्चना’ ही व्यक्तीरेखा साकारली होती. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते. त्यानंतर ती अनेक कार्यक्रमांमध्येही काम करताना दिसून आली. २०२१ साली ती विकी जैनबरोबर लग्नबंधनात अडकली. दोघेही नुकतेच ‘बिग बॉस १७’ मध्ये दिसून आले होते. यामध्ये दोघांमधील वाद पाहायला मिळाले. त्यानंतर दोघांमध्ये घटस्फोट होणार अशा अनेक चर्चा देखील रंगल्या होत्या. पण नंतर मात्र अनेक पार्टीमध्ये एकत्र दिसून आल्याने दोघांमध्ये सर्व काही ठीक असल्याचे दिसून आले. (ankita lokhande on pregnancy)
त्यानंतर अंकिता व विकी एका म्युजिक सॉंगमध्ये देखील दिसून आले होते. हा दोघांचाही एकत्रित असा पहिला प्रोजेक्ट होता. त्यांच्या गाण्याला प्रेक्षकांची खूप पसंती देखील मिळाली. पण आता अंकिताने आई होण्याबद्दलच्या काही भावना व्यक्त केल्या आहेत. यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या अंकिताला गुडन्यूज कधी देणार असा प्रश्न सतत विचारला जातो. यावर अंकिताने उत्तर दिले की, “मी व विकी आम्ही दोघेही मुलांबद्दल बोलत असतो. ते आमचं भविष्य असणार आहेत. जेव्हा कधीही मला प्रेग्नन्सीबद्दल विचारले जाते तेव्हा माझ्याकडे लपवण्यासारख काहीच नसतं. कधी ना कधी मला मूल होणारच आहे. मला स्वतःला आई होण्याची खूप इच्छा आहे पण आम्हाला मूल कधी होणार याबद्दल तरी मी अजून काही सांगू शकत नाही. पण याबद्दल आमच्यात नेहमी चर्चा होत असते”.
पुढे ती म्हणाली की, “मी मूल होण्याआधीच सर्व तयारी करुन ठेवली आहे. त्याच्यासाठी खूप आठवणी देखील ठेवल्या आहेत. आलिया भट्टप्रमाणे मी देखील आता माझ्या मुलांसाठी इमेल लिहिणार आहे. जेणेकरून मला काय सांगायचं आहे हे त्यांना मोठं झाल्यावर पण समजू शकेल”.
अंकिताच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती नुकतीच रणदीप हुड्डाबरोबर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आली होती.