टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असलेली वाहिनी म्हणजे ‘स्टार प्रवाह’ वाहिनी. बरं ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील साऱ्याच मालिकांनी आजवर प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या वाहिनीवरील आजवर टीआरपीच्या रांगेत अव्वल स्थानावर असलेली मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग’. ‘ठरलं तर मग’ ही मालिका जेव्हापासून सुरु झाली तेव्हापासून प्रेक्षकांनी या मालिकेला अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. या मालिकेत सायली हे पात्र अभिनेत्री जुई गडकरी तर अर्जुन हे पात्र अमित भानुशाली साकारत आहेत. या दोन्ही कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. ही जोडी प्रेक्षकांच्या आवडत्या जोडीच्या यादीत अव्वल स्थानावर होती. (Marathi Serial TRP Rate)
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर एका नव्या मालिकेने हे चित्र पालटलं असल्याचं समोर आलं आहे. गेली कित्येक महिने ‘ठरलं तर मग’ मालिका टीआरपी यादीत पहिल्या स्थानी होती. आता मात्र ‘ठरलं तर मग’ मालिका टीआरपी यादीत पहिल्या स्थानावरुन घसरली असून, आता पहिल्या स्थानी ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने आपलं स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान व अभिनेता राज हंचनाळे यांची मुख्य भूमिका असणारी ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडू लागली आहे. या मालिकेने टीआरपीमध्ये केवळ टॉप १० मध्ये स्थान मिळवले नसून ‘आई कुठे काय करते’, ‘ठरलं तर मग’ या आघाडीच्या मालिकांना मागे पहिल्या क्रमांकावर आपलं स्थान निर्माण केलं आहे.

सलग दोन आठवडे ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका टीआरपी यादीत पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवून आहे. याचा आनंद मालिकेतील कलाकारांनी इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत व्यक्त केला. कलाकारांनी केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीनुसार पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या ‘प्रेमाची गोष्ट’चा टीआरपी रेट ६.८ आहे, तर ६.७ टीआरपीसह ‘ठरलं तर मग’ ही मालिका दुसऱ्या स्थानी आहे. तिसऱ्या स्थानावर ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका असून या मालिकेचा टीआरपी रेट ६.५ आहे.
तर चौथ्या स्थानी ‘सुख म्हणजे नक्की काय असते’ ही मालिका असून मालिकेचा टीआरपी रेट ६.१ आहे. तर अव्वल स्थानावर असणाऱ्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेचा टीआरपी रेट या आठवड्यात घसरला असून तो ६.० असून पाचव्या स्थानी आहे.