संघर्ष हा कधी कुणाला चुकलेला नाही. संघर्ष हा प्रत्येकाच्याच वाटेला आहे. मनोरंजन सृष्टीत काम करत असलेल्या कलाकाराच्या आयुष्यातील संघर्ष हा तर त्याच्या पाचवीलाच पूजेलेला. या क्षेत्रात काम करताना अनेक प्रकारचे संघर्ष कलाकाराला भोगावे लागतात. मग हा संघर्ष चित्रपटात काम करण्यापासून ते चित्रपटात टिकून राहण्यापर्यंतचा असतो. मनोरंजन क्षेत्रात आपले नशीब आजमावण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अनेक मुलं-मुली मायानगरीत येतात. यादरम्यान, अशा लोकांना अनेकदा संघर्षाचा सामना करावा लागतो आणि यामध्ये त्यांना अनेक अनुभवांना सामोरे जावे लागते. असाच काहीसा अनुभव एका सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला आला असून त्याने हा अनुभव शेअर केला आहे.
‘तान्हाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटात चुलत्या या पात्राची भूमिका साकारणारा मराठमोळा अभिनेता कैलास वाघमारेने त्याच्या या प्रसंगाबद्दल ‘इट्स मज्जा’शी साधलेल्या संवादात या अनुभवाबद्दल सांगितले. एका हिंदी निर्मात्याने कैलाशला मुख्य भूमिका देतो म्हणून सांगितले आणि त्यानंतर काय झाले? याबद्दल स्वत: अभिनेत्याने सांगितले आहे. कैलाशने नुकताच ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात संवाद साधला. यावेळी कैलाशने इंडस्ट्रीतील दुटप्पीपणा, रंगामुळे आलेले रिजेक्शन, भाषेमुळे झालेला अपमान यांसारख्या गोष्टींवर भाष्य केले.
आणखी वाचा – अंबानींचा नादच नाय! लग्नात आलेल्या पाहुण्यांना दिल्या महागड्या भेटवस्तू, किंमती ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
याच संवादादरम्यान, त्याने त्याच्या वाईट अनुभवाबद्दल सांगताना असं म्हटलं की, “हिंदी सिनेमासाठी मुख्य अभिनेता म्हणून त्याने माझी निवड झाली आणि त्या निर्मात्याने मला मराठीतला एक चांगला दिग्दर्शक सुचवण्यासाठी सांगितले. त्यावर मग मी उमेश कुलकर्णीचे नव त्यांना सुचवले. त्यानंतर त्याने मुख्य अभिनेत्रीही सुचवण्यास सांगितले आणि तीदेखील मी सुचवली. त्यानंतर त्याला मी माझा कास्टिंग दिग्दर्शकही दिला. मग सर्व काही सुरु झाल्यानंतर १५ दिवसांनी मी त्याला कॉल, मॅसेज केले. पण त्याने नंबर बंद करुन ठेवला होता. मग एकेदिवशी मी कास्टिंग दिग्दर्शकाला याबद्दल विचारले, तेव्हा त्याने मला भेटायला बोलावले”.
यापुढे कैलाशने असं म्हटलं की, “मग मी अंधेरीला त्या कास्टिंग दिग्दर्शकाला भेटायला गेलो. तेव्हा त्याने मला सांगितलं की, त्या निर्मात्याने मुख्य अभिनेता म्हणून माझ्याऐवजी कोणत्या दुसऱ्या अभिनेत्याला घेण्यास सांगितले आहे. त्याचं हे बोलणं ऐकून मला धक्काच बसला. यावर त्या कास्टिंग दिग्दर्शकानेदेखील निर्मात्याला काम करण्यास नकार दिला. यानंतर मी त्या निर्मात्याला कॉल किंवा मॅसेज केला नाही. हा अनुभव माझ्यासाठी खूप मोठा होता. मी त्या चित्रपटाशी एकरूप झालो होतो. मी ट्या चित्रपटासाठी, त्यातील भूमिकेसाठी तयारीला लागलो होतो. पण हे ऐकून मला वाईट वाटले. या गोष्टीचे मला खूप दु:ख झाले”.